साफसफाईच्या नावाखाली झाडे तोडली

बोल्हेगाव शाळेसमोरील प्रकार || शिवसेनेची आयुक्तांकडे तक्रार
साफसफाईच्या नावाखाली झाडे तोडली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बोल्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोर असलेल्या जागेची जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्याच्या नावाखाली झाडे तोडण्यात आल्याचा प्रकार स्वातंत्र्यदिनी घडला. शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास शिंदे यांच्या घरासमोरील ड्रेनेज लाईन व पाण्याच्या कनेक्शनचीही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करत याला जबाबदार असलेल्या प्रभाग अधिकार्‍यांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे. प्रभाग अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून जेसीबी पाठवण्यात आल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्यदिनी बोल्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोर जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात आली. या साफसफाईच्या नावाखाली माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेली झाडे महापालिकेची परवानगी न घेता तोडण्यात आली. तसेच शिंदे यांच्या घरासमोरील ड्रेनेज लाईन व पाण्याच्या कनेक्शनचीही तोडफोड करण्यात आली. पालिकेचे प्रभाग अधिकारी यांनी कुणाच्या सांगण्यावरून ही झाडे व ड्रेनेज लाईन तोडली? याचा खुलासा मागविण्यात यावा व संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. ड्रेनेज लाईन व पाण्याच्या कनेक्शनची दुरूस्ती करून द्यावी. अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, याप्रकरणी शिंदे यांनी तोफखाना पोलिसांतही तक्रार दिली आहे. संजय धामणे व रमेश वाकळे हे साफसफाईच्या ठिकाणी असताना शिंदे यांच्या आईने त्यांना झाडे तोडू नका असे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com