कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानातील जल घटकांतर्गत शहर व शहराच्या परिसरातील जलस्त्रोतांची स्वच्छता

अभियानांतर्गत गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले तर कचेश्वर व शुक्लेश्वर घाट येथे स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्रातील व परिसरातील साफ-सफाई करण्यात आली.

महाराष्ट्राची दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी कोपरगाव शहरातून वाहते. पूर्वी बाराही महिने वाहणारी नदी आता वाढत्या प्रदुषणामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वाहतांना दिसत नाही. गणेशोत्सव, शारदा उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये नदीच्या पात्रात निर्माल्य विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नदीपात्रामध्ये घाण पसरलेली आहे. तसेच या ठिकाणी नियमित होत असणारे अस्थी विसर्जन विधी या कारणाने नदीपात्रातील पाणी प्रदूषित व अस्वच्छ होते आहे.

या स्वच्छता मोहिमेमध्ये नदीपात्रातील 3 ट्रॅक्टर कचरा गोळा करून सदर कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे पाठवण्यात आला. स्वच्छता मोहीम यशस्वी करणे कामी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोरडे, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी यासह गोदामाई प्रतिष्टान टीम यांच्या सक्रीय सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली.यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजय वाहडणे, नगरसेवक जनार्धन कदम, शिवाजी खांडेकर, सत्यम मुंदडा, आदिनाथ ढाकणे यांच्यासह कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, गोदामाई प्रतिष्ठानची टीमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाणी हे जीवन आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत स्वच्छ राहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जल जमीन जंगल हवा नैसर्गिक पर्यावरणाचे स्त्रोत आहेत. निरोगी जीवनासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता बाळगली पाहिजे व नैसर्गिक स्त्रोत प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियान यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा व पर्यावरण संवर्धनात सहकार्य करावे. - मुख्याधिकारी प्रशांत सरोदे.