स्वच्छ सर्वेक्षण : पश्चिम विभागात शिर्डी देशात द्वितीय
सार्वमत

स्वच्छ सर्वेक्षण : पश्चिम विभागात शिर्डी देशात द्वितीय

नगरपंचायतला राज्य शासनाचे 15 कोटींचे बक्षीसही मिळणार

Arvind Arkhade

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत शिर्डी नगरपंचायतला स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत पश्चिम विभागात देशात दुसरा क्रमांक तर पश्चिम विभागातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून राज्य शासनाच्यावतीने 15 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

सदर पुरस्कार नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व शिर्डीचे तत्कालीन मुख्याधिकारी सतीश दिघे यांना देण्यात आला. पंचवीस ते पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये शिर्डी नगरपंचायतने पश्चिम विभागातून देशात दुसरा क्रमांक पटकावला असून शिर्डी नगरपंचायतला राज्य शासनाचे 15 कोटींचे बक्षीसही मिळणार आहे.

भारत सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाद्वारे शिर्डी शहराला कचरामुक्त शहर (जीएफसी) स्टार रेटींगमध्ये थ्री स्टार मानांकन देण्यात आलेले असून हागणदारीमुक्त शहरांमध्ये ODF ++ हे सर्वोत्तम मानांकन घोषित करण्यात आलेले आहे.

केंद्र सरकारद्वारे देशातील सर्व शहरे स्वच्छ होऊन स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीच्या माध्यमातून जनसहभागातून व्यापक चळवळ उभारली जावी यासाठी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी कचरा न करता स्वच्छता ठेवणे, व्यक्तिगत स्वच्छता, श्रमदान, कचरा विलगीकरण, घरोघरी ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत बनविणे, प्लास्टीक बंदी,

पाणी बचत, वृक्ष लागवड व संगोपन शहरे हागणदारीमुक्त होण्यासाठी वैयक्तिक, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करणे व त्यामध्ये संपूर्ण शहर हागणदारीमुक्त करणेबाबत नगरपरिषदांना निर्देश देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने शिर्डी नगरपंचायतद्वारे स्वच्छ सर्वेक्षण 2020 या कार्यक्रमांतर्गत कचरामुक्त शहर, वैयक्तिक, सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचा दर्जा, साफसफाई, सुशोभीकरण व इतर सोईसुविधांबाबत विशेष प्रयत्न करण्यात आले होते.

शिर्डीकर आणि माझ्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत अभिमानाचा आहे. श्री साईबाबांच्या पवित्र शहराची आता स्वच्छ शहर म्हणूनही ओळख निर्माण झालेली आहे. शिर्डी नगरपंचायतने पश्चिम विभागात सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून पटकावलेल्या पुरस्काराबद्दल विशेष कौतुक आहे.

- आ. राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी शहर स्वच्छतेबाबत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा नेहमी असलेला आग्रह, त्यासाठी त्यांनी सर्व पातळीवर केलेली मदत, श्री साईबाबा संस्थानचा निधी, शहरातील सर्व नागरिक, सर्व पदाधिकारी, अधिकारी, सफाई कर्मचारी या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून शिर्डी शहराला हा पुरस्कार मिळाला आहे.

- अर्चनाताई कोते, नगराध्यक्षा, शिर्डी नगरपंचायत

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये शहर स्वच्छतेसोबतच वेळोवेळी योग्य ती ऑनलाईन माहिती भरणे, कागदपत्रांचे सादरीकरण यासारख्या अनेक बाबींची तपासणी केली जाते. शिर्डी नगरपंचायतद्वारे या सर्व बाबींची अतिशय बारकाईने नियोजन केल्यामुळेच हा पुरस्कार मिळाला. यापुढे स्वच्छता टिकविणे आणि सर्वोच्च स्थानी राहणे हे आव्हान आपल्यापुढे असणार आहे.

- काकासाहेब डोईफोडे, मुख्याधिकारी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com