
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील ऐतिहासिक क्लेरा ब्रूस मैदानाच्या (Clara Bruce Plot) भूखंडावर महाराष्ट्र शासन अशी नोंद (Government of Maharashtra Record) नगर भूमापन विभागाने (Department of Surveying) केली. या संपूर्ण जागेमध्ये 1978 सालापासून कायमकुळ म्हणून युनायटेड चर्च बोर्ड (मराठी मिशनरी) चेच नाव आहे. याचा फेरफार पूर्वी मंजूर झालेला असून सीटीएस नं.7443 पूर्वीचा 353/356. अ.ब.क. आहे. तसेच धर्मदाय आयुक्तांकडे पी.टी.आर. रेकॉर्डवर देखील सदर प्रॉपर्टीची ट्रस्टच्या नावे नोंद असून या प्रॉपर्टीवर महाराष्ट्र शासनाचे नाव लावल्याचे अनेकांनी स्वागत केले.
मराठी मिशनचे सचिव डी.जी भांबळ, बिशप बिपिन मासिंह, अनिल पडघडमल, विशाल केदारी, राजू देठे, राजू पटेल, सुभाष जाधव, प्रवीण वाघमारे, विद्याताई भांबळ, प्रतीक बारसे, अतुल गवारे, डॅनियल काळोखे, सुधीर देठे, रॉनी ठोंबरे, अशोक गायकवाड, सागर शिंदे, सूरज जोशी, स्वप्नील शिंदे, मार्टिन पारधे, किरण कांबळे, थॉम्स केदारी, देविदास कांबळे, अमोल केदारी, कुंदन भिंगारदिवे, विलास पाटोळे, सागर घोडके, राजेश उजागरे आदींनी याबाबत आनंद साजरा केला. या जागेवर दावा करणार्या बिल्डरांचे व इतरांचे दावे आता निकाली निघणार आहे.
अमेरिकन मराठी मिशनरीच्या वतीने क्लेरा ब्रूस ही ऐतिहासिक शाळा व इतर शैक्षणिक उपक्रम चालवण्यात येत असलेल्या 26 एकराच्या परिसरातील जागा आमच्या मालकीची असल्याचा दावा काही बिल्डर व नागरिक करत आहेत. यापैकी काही जण या जागेचा दहशतीच्या जोरावर ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे. गत महिन्यात 1 एकर भूखंडाचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार मराठी मिशनरीच्या पदाधिकार्यांनी व विविध संघटनांनी या संदर्भात पोलीस दलासह विविध विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत.
क्लेरा ब्रूस भूखंड ही इनाम जमीन असताना तिच्यावर बिल्डर लॉबी दावा कसा करते, असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसेच या जागेवरील सर्व खरेदी खताचे व्यवहार हे अप्पर जिल्हाधिकार्यांनी 18 फेब्रुवारी 2019 च्या आदेशाने रद्द ठरवले असून ही इनाम जमीन मुदतीत रिग्रँट न झाल्यामुळे जमिनीच्या महसूल अभिलेखात महाराष्ट्र शासन अशी नोंद करण्याचा आदेश काढलेला आहे.