‘विद्युत’च्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा

जिल्हा रूग्णालय आग प्रकरण : तपासात अडचणी
‘विद्युत’च्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रूग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. मात्र राज्याच्या मुख्य विद्युत विभागाकडून पोलिसांना अहवाल प्राप्त न झाल्याने तपासात अडचणी येत आहे. संबंधीत विभागाकडे पाठपुरावा करून देखील पोलिसांना अहवाल मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

6 नोव्हेंबर रोजी आग लागून सुरूवातीला 11 व नंतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता आगीतील बळींची संख्या 13 झाली आहे. सरकारने जिल्हा शल्य चिकित्सकांसह सहा जणांवर कारवाई करत चौकशी समिती नियुक्त केली. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. एक वैद्यकीय अधिकारी, दोन परिचारीका व एक परिचारक यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. दरम्यान आग प्रकरणी तपास करण्यात पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधार घेऊन चौघांना अटक केली असली तरी यामध्ये खरे गुन्हेगार शोधण्यासाठी चौकशी समिती, विद्युत विभाग यांचे अहवाल पोलिसांंच्या हाती येणे आवश्यक आहे. यानंतरच तपासाला गती मिळू शकते, त्यातून खरे गुन्हेगार समोर येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. घटना घडल्यानंतर लगेच राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक यांनी अतिदक्षता विभागाला भेट देत नोंदी घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांना अजून अहवाल दिला नसल्याने पोलिसांना पुढील तपास करण्यात अडचण निर्माण झाली आहे.

आगप्रकरणी जास्तीत जास्त जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. सुमारे 100 पेक्षा अधिक व्यक्तींचे जाबब नोंदविले जाणार आहे. घटना घडली त्यावेळी रूग्णालयात हजर असलेल्या डॉक्टर, कर्मचार्‍यांसह बाहेरच्या व्यक्तींचा यामध्ये जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डॉ. पोखरणा यांनी केले पुरावे सादर

जिल्हा रूग्णालयाचे निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना पोलिसांनी भादंवि 91 नुसार नोटीस सादर करून निर्दोषतत्वाचे पुरावे घेऊन हजर राहण्याचे आदेश दिले होते. डॉ. पोखरणा यांनी त्यांच्याकडील पुरावे सादर केले असल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले. तपासासाठी विद्युत विभागाचा अहवाल आवश्यक असून तो प्राप्त होण्याची वाट पाहत असल्याचेही उपअधीक्षक मिटके यांनी सांगितले.

अहवालातून आगीचे कारण समोर येणार

राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक यांनी जिल्हा रूग्णालयातील जळीत अतिदक्षता विभागाला भेट देऊन पाहणी केली. अतिदक्षता विभागामध्ये इलेक्ट्रीकचे काम अशा पद्धतीने झाले होते, याच्या नोंदी त्यांनी घेतल्या. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांना विद्युत विभागाच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. मात्र 15 दिवस झाले तरी विद्युत विभागाचा अहवाल पोलिसांना मिळालेला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com