जिल्हा रूग्णालय आग प्रकरण : डॉ. पोखरणांना मागितले निर्दोषत्वाचे पुरावे

पोलिसांची नोटीस
जिल्हा रूग्णालय आग प्रकरण : डॉ. पोखरणांना मागितले निर्दोषत्वाचे पुरावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन घेतला असल्याने पोलिसांनी त्यांना भादंवि 91 नुसार नोटीस काढली आहे. तुम्हाला अटक करू नये म्हणून तुमच्याकडे कोणते सबळ पुरावे आहेत. (निर्दोष असल्याचे पुरावे) ते घेऊन पोलीस ठाण्यात हजर होण्याबाबत ही नोटीस असल्याने पोलिसांपुढे डॉ. पोखरणा काय पुरावे सादर करणार याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान डॉ. पोखरणा यांच्या जामीन अर्जावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी न्यायालयामध्ये आक्षेप घेतला आहे. जाधव यांनी यासंदर्भात हरकती नोंदवत थर्ड पार्टी अर्ज न्यायालयामध्ये दाखल केला आहे. या अर्जावर सरकारी वकील व आरोपींच्या वकिलांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश येथील जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आगीत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांत दाखल गुन्ह्यात एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिकांना अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाला असला तरी पोलीस तपासात सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी यापूर्वी डॉ. पोखरणा यांचा जबाब नोंदविला आहे. आता त्यांना पुरावे घेऊन पोलिसांसमोर हजेरी लावण्याबाबत नोटीस काढली आहे. यामुळे डॉ. पोखरणा काय पुरावे सादर करणार याची उत्सुकता लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com