कागदपत्रांची जुळवाजुळव अन् चौकशी समितीसमोर हजेरी

जिल्हा रुग्णालय आग : डॉ. पोखरणा यांची चौकशी
कागदपत्रांची जुळवाजुळव अन् चौकशी समितीसमोर हजेरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीसमोर निलंबित तत्कालीन जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. सुनील पोखरणा गुरूवारी हजर झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने डॉ. पोखरणा यांच्याकडे चौकशी केली. दरम्यान गुरूवारी चौकशी समिती येणार असल्याने डॉ. पोखरणा सकाळीच जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यांनी त्याठिकाणी कागदपत्रांची जुळवाजुळव करून दुपारनंतर चौकशी समितीसमोर हजेरी लावली.

जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी डॉ. पोखरणासह सहा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सरकारने चौकशी समिती नियुक्त केली असून चौकशी सुरू केली आहे. समितीने डॉ. पोखरणा यांना म्हणणे मांडण्यासाठी बोलविले होते. त्यांनी समितीसमोर नेमका काय खुलासा केला, याची उत्सुकता आहे. डॉ. पोखरणा जिल्हाधिकारी कार्यालयात जात असताना त्यांच्या हातामध्ये काही कागदपत्रांची फाईल होती. फाईलमध्ये नेमके कोणते कागदपत्र होते? डॉ. पोखरणा यांनी समितीसमोर काय जबाब दिला, त्यासंदर्भात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

दरम्यान, डॉ. पोखरणा यांचे निलंबन झाले असतानाही ते जिल्हा रुग्णालयात येतात. तेथील कर्मचार्‍यासोबत कागदपत्रांची जुळवाजुळव करतात याबाबत आयुक्त गमे यांना विचारणा केली असता, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त गमे यांनी चौकशीसाठी काही अधिकार्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत, ते अधिकारी देखील जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com