नगरमध्ये दोन हजार तरूणांचे लसीकरण

नगरमध्ये दोन हजार तरूणांचे लसीकरण

ग्रामीण भागात अद्याप मंजुरीची प्रतीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी करोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. नगर शहरात महानगरपालिकेच्या पाच आरोग्य केंद्रावर लसीकरण होत असून शहरासाठी 10 हजार डोस प्राप्त झाले आहेत. शनिवारी या पाच लसीकरण केंद्रावर दुपारी दोन ते पाच यावेळेत 954 तर रविवारी 1 हजार 233 तरूणांना करोनाचा पहिला डोस देण्यात आला.

दरम्यान, अद्याप ग्रामीण भागातील तरूणांना करोनाची लस देण्याबाबत अद्याप कोणत्याच सुचना राज्य सरकारकडून आरोग्य विभागाला नाहीत. शहरात सुरू असणार्‍या लसीकरणासाठी दहा हजार लसचा साठा आला असून त्याव्दारे हे लसीकरण सुरू आहे. मात्र, 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी असणारा जिल्हा परिषदेकडील लसचा साठा संपला आहे. सरकार पातळीवरून साठा आल्यानंतर तिचे जिल्ह्यात वितरण करण्यात येणार आहे.

यामुळे आज (सोमवारी) जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात शिल्लक असणार्‍या साठ्यातून लसीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले. हा साठा संपल्यानंतर लस आल्यानंतर ग्रामीण भागात लसीकरण सुरू होवू शकणार आहे.

केंद्र सरकारच्या घोषणेनूसार 1 पासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील तरूणांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. नगर शहरातील पाच लसीकरण केंद्रावर दोन दिवसांत 2 हजार 187 जणांना या वयोगटातील तरूणांना पहिला डोस देण्यात आला. याचा आ. संग्राम जगताप व मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या तरूणांनी रविवारी नगरमध्ये लस घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र सर्वच आरोग्य केंद्रावर दिसले.

मनपाने ठोस असे नियोजन केले नसल्याने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. लससाठी नोंदणी केलेल्यांना वेगवेगळ्या वेळांचे मेसेज आले होते. त्यांनी सकाळी सातपासून केंद्रावर गर्दी केली. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने करोना धोका अधिक वाढत आहे. याबाबत मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्यातील सर्वच लसीकरण ठिकाणी गर्दी होत आहे. फक्त नगरमध्येच गर्दी होते असे नाही. नोंदणी केलेल्यांना लस दिली जात आहे. तरीही लोक गर्दी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com