नगर शहरात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू

नगर शहरात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू

पहिल्या दिवशी 954 जणांचे लसीकरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रत्येकाने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. याच बरोबर करोना प्रतिबंधक लसीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्यावतीने आज 1 मे पासून 18 वर्ष ते 44 वर्षी पर्यतच्या नागरिकांना कोरणा प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

नगर महानगरपालिकेला 10 हजार लसीकरणासाठी डोस पुरवठा झाला असून लवकरात लवकर जास्तीत जास्त लसीकरनाचे डोस प्राप्त करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

नगर महानगरपालिकेच्या वतीने 18 वर्ष ते 44 वर्षा पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना जिजामाता आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ आ. जगताप व आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, तसेच डॉक्टर, नर्स आरोग्य कर्मचारी उपस्थित होते

आयुक्त शंकर गोरे म्हणाले, महाराष्ट्र दिनी 18 वर्ष ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा कार्यक्रम नगर शहरामध्ये सुरू झाला असून नगर महानगर पालिकेला शासनाकडून 10 हजार लसीकरणाचे डोस उपलब्ध झाले आहे. शहरांमध्ये पाच लसीकरण केंद्रावर दररोज दीड हजार लसीकरणाचे डोस दिले जाणार आहेत. यासाठी नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप वर नोंदणी करणे बंधनकारक असून तरी सर्व नागरिकांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. आज शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत 18 वर्षे पूर्ण असलेल्या बालिकेला लसीकरणाचा डोस देऊन शुभारंभ झाला.

शहरातील मुकूंदनगर नागरी आरोग्य केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिक यांच्या लसीकरणास आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीमध्ये सुरूवात झाली.

राज्यभरात आजपासून (शनिवारी) 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. नगर शहरात महापालिकेच्या पाच लसीकरण केंद्रावर दुपारी दोन ते पाच यावेळेत 954 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. याचा शुभारंभ बुरुडगाव रोडवरील जिजामाता आरोग्य केंद्रात आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानंतर पाच केंद्रावर लसीकरण करण्यात आले. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी 10 हजार डोस आलेले आहेत. दररोज दीड हजार डोस दिले जाणार आहेत. आज पहिला दिवस असल्याने व दुपारनंतर लसीकरण सुरू झाल्याने 954 व्यक्तींना लस देण्यात आली असल्याची माहिती मनपा उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com