सिटी सर्व्हे कडून मालमत्ता उतार्‍याची अव्वाच्या सव्वा फी

लक्ष्मीनारायण नगर, कृष्णानगर, झिरंगे वस्ती, सोनवणे वस्ती नागरिकांची थेट महसूल मंत्र्यांकडे तक्रार
सिटी सर्व्हे कडून  मालमत्ता उतार्‍याची अव्वाच्या सव्वा फी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील सिटी सर्व्हे कार्यालयात मालमत्ता उतारा फी जास्त लावली जात असून त्याची रितसर पावती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. सांगितलेली संपूर्ण फी भरल्याशिवाय उतारा मिळणार नाही असा दमही भरला जात आहे. तरी या अन्यायकारक मालमत्ता उतारा फी बाबत आपण लक्ष घालून नियमित फी भरुन आम्हाला उतारे मिळणेसाठी संबंधित कार्यालयाला आदेश, अशी मागणी लक्ष्मीनारायण नगर, कृष्णानगर, झिरंगे वस्ती, सोनवणे वस्ती येथील नागरिकांनी केली आहे.

सिटी सर्व्हे कार्यालय श्रीरामपूर येथील अधिकारी यांचेबरोबर मालमत्ता उतारा फीबाबत समक्ष कार्यालयात चर्चा केली संबंधित अधिकारी यांनी सांगितले, सर्व्हे नंबरवर जी नावे उतार्‍यावर आहेत त्या सर्वाची प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे फी आहे. सदर सर्व्हे नंबर 200 अ सर्वे नंबर 28 वर अंदाजे 435 नागरिक रहिवासी यांची नावे आहेत. त्यामुळे उतारा फी 4350 रुपये भरूनच उतारा मिळेल. असा शासनाचा आदेश आहे. आम्ही संबंधिताना शासकीय आदेशाची प्रत मागितली परंतु संबंधितांनी देण्यास टाळाटाळ करून प्रत दिलेली नाही. आम्ही या ठिकाणी अंदाजे 50 ते 60 वर्षापासून राहत आहोत. ज्या वर्षी प्लॉट खरेदी केला त्याच वर्षी त्या वेळेस सिटी सर्व्हे कार्यालयात व तलाठी कार्यालयात सदर खरेदीची नोंद केलेली आहे व त्याप्रमाणे नियमित एका उतार्‍याची फी भरून उतारे मिळालेले आहेत. परंतु संबंधित अधिकार्‍यांनी वरील प्रमाणे फी ची रक्कम मागणी केलेली आहे.

खरेदीच्यावेळी ले-आउट प्लॉट व नगर रचना कार्यालयाने मंजूर केलेले व सदरच्या क्षेत्राचे मोजणी करूनच ले आउट मंजूर केलेले आहेत. यामध्ये बरेचसे क्षेत्र कलेक्टर (बिगरशेती) आहेत. आजपर्यंत प्रत्येक नागरिकाचा स्वतंत्र सिटी सर्व्हे उतारा मिळत होता; परंतु आज उतारा काढण्यास गेलो असता सदर सर्व्हेनंबरमध्ये जेवढे नागरिक आहोत त्या संपूर्ण क्षेत्रांची फी भरून उतारे मिळतात. प्लॉटखरेदी करून नगर परिषद श्रीरामपूर यांची बांधकामाची पूर्व मंजुरी घेवूनच घर बांधकाम केलेले आहे व तशी नोंद देखील केलेली आहे. तसेच सदरची नोंद सिटी सर्व्हे कार्यालय व तलाठी कार्यालयात त्याचवेळी केलेली आहे.

तरी या अन्यायकारक मालमत्ता उतारा फीबाबत आपण लक्ष घालून न्याय द्यावा व आमचे वैयक्तिक उतारे नियमित फी भरुन आम्हाला उतारे मिळणेसाठी आदेश द्यावेत. संबंधित सिटी सर्व्हे कार्यालयातील अधिकारी नागरिकांना सहकार्य करत नाही व कुठल्याही कामाकरिता वारंवार चकरा मारायला लावतात याची देखील नोंद घ्यावी. संबंधिताना कार्यालय कामकाजाबत वेळेत कामे होणेसाठी आदेश द्यावेत, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com