शिवसेनेचे आठ ते दहा नगरसेवक मुख्यमंंत्री शिंदेंसमवेत येणार

जिल्हा प्रमुख शिंदे यांचा गौप्यस्फोट, शिवतीर्थ मेळाव्यासाठी उद्या नियोजन बैठक
शिवसेनेचे आठ ते दहा नगरसेवक मुख्यमंंत्री शिंदेंसमवेत येणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेतील पाच नगरसेवक सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. याशिवाय आणखी आठ ते दहा नगरसेवक मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन देण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांनी थोडा वेळ मागितला आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेतील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नगरसेवक अनिल शिंदे यांनी सोमवारी येथे केला.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांची दसर्‍याच्या दिवशी मुंबईत सभा होणार असून त्या सभेसाठी नगरमधून कितीजण जाणार याच्या नियोजनासाठी उद्या बुधवारी (दि. 21) दुपारी 12 वाजता बुरुडगावरोडवरील नक्षत्र लॉन येथे बैठक होणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह खा. राहुल शेवाळे व आ. अनिल बाबर यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिर्डीचे शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी दिली.

यावेळी शिंदे म्हणाले, माझी पत्नी शीला शिंदे तसेच सुरेखा कदम व रोहिणी शेंडगे यांना महापौर करण्यात मुख्यमंत्री शिंदे यांचा शंभर टक्के हात आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर आहे. मात्र, अन्य काहीजण का त्यांच्याबरोबर नाहीत, हे मला सांगता येणार नाही. पण महापालिकेतील सचिन जाधव, अक्षय उनवणे, संग्राम शेळके, सुभाष लोंढे व मी स्वतः असे शिवसेनेचे पाच नगरसेवक आणि माजी नगरसेवक अनिल लोखंडे व काका शेळके आम्ही मुख्यमंत्री शिंदेंसमवेत आहोत.

मनपातील शिवसेनेचे आणखी आठ ते दहा नगरसेवक माझ्या संपर्कात असून त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंसमवेत येण्यास काही वेळ मागितला आहे. तो त्यांना दिला आहे. त्यामुळे ते आमच्यासमवेत येणार हे नक्की आहे व त्यामुळे आमची ताकदही शहरात वाढणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

महापालिका भिंगारला पाणी देणार

अमृत पाणीयोजनेचे 42 मीटरचे काम बाकी आहे. ते काम झाल्यावर शहराला वाढीव पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महापालिकेद्वारे भिंगारला पाणी पुरवठा करण्याच्या आमच्या मागणीस मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे व तसा प्रस्ताव करण्याचे आदेश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत, असा दावा करून नगरसेवक शिंदे म्हणाले. हा विषय आम्ही महासभेच्या अजेंड्यावर घेतला होता. परंतु महासभेत अजेंड्याच्या विषयांवर चर्चा झाली नाही. मात्र, त्यानंतर आम्ही आयुक्तांना भेटून भिंगारला महापालिकेद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्ताव तयार करण्याबाबत सांगितले आहे व या विषयाचा आम्ही पाठपुरावा करीत आहोत, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. याशिवाय भुयारी गटारी योजनेत समाविष्ट न झालेला शहराचा भाग समाविष्ट करून त्याचीही नवीन योजना करण्याचा प्रस्ताव आयुक्तांना करण्यास सांगितले आहे. शहरातील रस्त्यांचेही प्रस्ताव करण्यात येत आहेत. नगर शहरासाठी सुमारे 400 ते 500 कोटी देण्याची तयारी मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवली आहे, असा दावाही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com