नगरमध्ये जोरदार पावसामुळे दाणादाण; झाडे पडली, वीज गायब

सखल भागात तलावाचे स्वरूप || मनपाकडून उपाययोजना
नगरमध्ये जोरदार पावसामुळे दाणादाण; झाडे पडली, वीज गायब

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. ठिकठिकाणी झाडे पडली, वीज पुरवठाही खंडित झाला. गुरूवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. पडलेली झाडे तातडीने बाजुला करण्याचे काम महापालिकेच्या उद्यान विभागाने मध्यरात्रीपासून हाती घेतले ते गुरूवारी दिवसभर सुरू होते.

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक वारा आणि त्या पाठोपाठ जोराचा पाऊस सुरू झाला. यानंतर काही वेळातच वीजपुरवठा खंडित झाला. जोराचा वारा आणि पाऊस यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली. काही वेळातच शहरातील दिल्लीगेट, प्रोफेसर कॉलनी चौक, पटवर्धन चौक आदी सखल भागात तलावाचे स्वरूप आले. घराबाहेर असलेले रात्री उशीरापर्यंत अडकून पडले. जोराचा वारा असल्याने त्याचा फटका झाडांना बसला.

बुरूडगाव रस्त्यावरील चौकात मोठे झाड कोसळले. रस्त्यावरच झाड कोसळल्याने वाहतुकीलाही अडकाठी निर्माण झाली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच महापालिका उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजान यांनी मध्यरात्री आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी जात कोसळलेल्या झाडाच्या फांद्या कापून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला.

सावेडीत महालक्ष्मी उद्यानाजवळ लिंबाचे मोठे झाड कोसळल्याने मनपाचे कर्मचारी तेथे गेले आणि उपाययोजना केल्या. याच दरम्यान वसंत टेकडी येथे असलेल्या महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील झाड कोसळले. मात्र आयुक्त जावळे यांनी अगोदर शहरातील कोसळलेले झाडे बाजुला करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. उद्यान विभागाचे कर्मचार्‍यांचे हे काम सुरू असतानाच कोहिनूर मंगल कार्यालय परिसरात असलेल्या नॅशनल गन हाऊस येथे पावसाचे पाणी शिरल्याची माहिती मिळाली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी धाव घेत उपाययोजना केल्या. तसेच रात्री उशीरा या भागातल नरहरीनगर, ममता गॅस परिसर, मॉडर्न कॉलनी आदी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. अचानक आलेल्या पावसामुळे घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रात्रभर जागे राहण्याची वेळ त्यांच्यावर आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com