नगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
सार्वमत

नगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

शहर पोलिसांनी तिरट जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम व पाच मोबाईल असा एकुण ४९ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे स्टेशन नजीक अकोलकर वीटभट्टी जवळ मोकळ्या जागेत ही कारवाई केली. या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

लखन विठ्ठल कुसळकर (वय- २०), धनेश दिलीप चव्हाण (वय- २७), गणेश सुनील गायकवाड (वय- २१), कैलास अनिल कावळे (वय- ३१) व मिनीनाथ एकनाथ गाडीलकर (वय- ४५) असे गुन्हा दाखल झालेल्या जुगारी इसमांची नावे आहेत. रेल्वे स्टेशन नजीक अकोलकर वीटभट्टी जवळ मोकळ्या जागेत काही इसम तिरट जुगार खेळत असल्याची माहिती शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार उपअधीक्षक मिटके यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास रेल्वे स्टेशन नजीक अकोलकर वीटभट्टी जवळ मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी तेथे त्यांना पाच लोक तिरट जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे खेळात लावलेली ३१ हजार ९७० रुपयांची रोख रक्कम १७ हजार ६०० रुपये किंमतीचे पाच मोबाईल असा एकूण ४९ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रविण भोसले, समाधान सोळुंके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेलार, पोलीस शिपाई परते, वडते यांच्या पथकाने केली.

Deshdoot
www.deshdoot.com