खाकी वर्दीतील 240 करोना पॉझिटिव्ह

दोनशे पेक्षाजास्त करोनामुक्त; तिघांचा मृत्यू
खाकी वर्दीतील 240 करोना पॉझिटिव्ह

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुरूवातीच्या काही महिने करोनापासून दूर राहिलेल्या जिल्हा पोलीस दलात दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे.

जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी असे मिळून आतापर्यंत एकूण 240 जणांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे. यामध्ये 17 अधिकारी आहेत, तर इतर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यात 30 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील एकाची प्रकृती चितांजनक आहे. दोनशे पेक्षा जास्त पोलिसांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिली.

सहा महिन्यापासून जिल्हा पोलीस दल अविश्रांती काम करत आहेत. करोना संसर्गकाळात अधिकारी व कर्मचारी अशी मिळून सुमारे 3 हजार 200 कर्मचारी जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यातील 560 जण 55 वर्षावरील तसेच विविध विकाराने ग्रस्त आहेत.

त्यांना सध्याच्या काळात बंदोबस्तासाठी तैनात केले जात नाही. गृहविभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे या नोडल अधिकारी म्हणून काम पाहतात. पोलिसांना करोना संसर्ग झाल्यास त्यांच्या उपचारापासून ते बिलापर्यंत काही अडचणी आल्यास त्यावर उपअधीक्षक पाठपुरावा करून कार्यवाही करतात.

दर आठवड्याला करोना संदर्भातील आढावा घेतला जातो, असेही अखिलेश कुमार सिंह यांनी सांगितले. करोनावर उपचार घेण्यासाठी पोलीस वेलफेअर फंडातून देखील मदत केली जाते. खाजगी रुग्णालयात उपचार घेताना बिलासंदर्भात काही तक्रारी होत्या.

त्यावर देखील कार्यवाही झाली. काही रुग्णालयांच्या बिलांचे लेखापरीक्षण सुरू आहे. करोना संसर्गामुळे उपचार घेत असताना आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण पोलिसांना जाहीर केले आहे. त्यानुसार प्रास्ताव देखील पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

गेल्या सहा महिन्यांपासून तीन हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी करोना बंदोबस्तावर आहे. सुरूवातीच्या काही महिने पोलीस दलात करोनाचा शिरकाव झाला नव्हता. परंतू, गेल्या दोन महिन्यामध्ये 240 पोलिसांना करोनाचे निदान झाले आहे. त्यात 55 वर्षांपुढील पोलिसांना, तसेच विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या पोलिसांना सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे इतर पोलिसांवर कामांचा ताण वाढला आहे. रात्रंदिवस ड्यूटी करण्याची वेळ पोलिसांवर येत आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून चोर्‍या, घरफोड्या, रस्तालुटीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. सण-उत्सव बंदोबस्त, दैनंदिन कामकाज, वाढते गुन्हे, गुन्ह्यांचा तपास यामुळे पोलिसांच्या कामाचा ताण वाढला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com