पंढरपूरच्या हाप मर्डरमधील आरोपी मंगलगेटला सापडले

एलसीबी पथकाने पकडले : नातेवाईकांकडे घेतला होता सहारा
पंढरपूरच्या हाप मर्डरमधील आरोपी मंगलगेटला सापडले

अहमदनगर (प्रतिनिधी) - पंढरपूर येथील हाप मर्डरच्या गुन्ह्यातील आरोपींना नगर एलसीबी पोलिसांनी मंगलगेट येथून ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यानंतर पंढरपुरातून पसार झालेले दोघे आरोपी नगरला नातलगाकडे थांबले होते.

अभिषेक ऊर्फ निखील प्रताप गंगेकर (अनिलनगर, पंढरपूर) आणि विवेक नागेश गंगेकर (रा. जुनीपेठ, पंढरपूर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून शिवा रामा इंदापुरकर या मजुरावर खुनी हल्ला केल्याच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेले गंगेकर हे पसार होते. ते नगरच्या मंगलगेट परिसरात नातेवाईकाकडे असल्याची माहिती नगर एलसीबीचे पीआय अनिल कटके यांना समजली.

त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. सहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणेकर, संदीप घोडके, शंकर चौधरी, संदीप पवार, सचिन अडबल, रवी सोनटक्के, आकाश काळे, जालिंदर माने, रोहित मिसाळ, भरत बुधवंत यांनी मंगलगेट भागात झडती घेत दोघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी वापरलेली ब्रिझ्झा कार (एम.एच.26,बीसी-4737) ही पोलिसांनी ताब्यात घेतली. पकडलेल्या आरोपींना पंढरपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम यांच्या ताब्यात देण्यात आले.

शिवा इंदापूरकर याचे अण्णा डांगे, सुरज गंगेकर, अभिषेक गंगेकर यांच्याशी दोन महिन्यापूर्वी भांडण झाले होते. त्याची तक्रार इंदापूरकर याने पंढरपूर पोलिसांत दिली होती. पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून गंगेकर याने कोयत्याने हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पंढरपूर पोलिसांत यासंदर्भात हाप मर्डरचा गुन्हा दाखल आहे. पकडलेले आरोपी हे सराईत असून त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापती करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे अशा स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com