शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अधिकार्‍यांवर गुन्हा
सार्वमत

शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अधिकार्‍यांवर गुन्हा

पावणे तीन कोटी अपहार

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर सहकारी बँकेने कर्जदाराची परवानगी नसताना त्याच्या कर्जखात्यातून दोन कोटी 73 लाख 55 हजार रुपयांची रक्कम परस्पर अन्य खात्यात वर्ग केली. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

बँकेचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा व उपाध्यक्ष प्रा. सुजित बेडेकर यांच्यासह संचालक मंडळ सदस्य तसेच बँकेचे संबंधित शाखाधिकारी, कॅशियर, धनादेश वटविणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. नगरमधील बाबूलाल सुमरेमल बच्छावत (रा. भिस्तबाग, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांची माणक एन्टरप्रायजेस ही फर्म असून, खाद्यपदार्थांच्या होलसेल व रिटेल विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसाय वृद्धीसाठी त्यांनी 17 जानेवारी 2019 रोजी बँकेच्या झेंडीगेट शाखेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता. 24 जानेवारी 2019 ला त्यांना 3 कोटीचे कर्ज मंजूर झाले. यापैकी 2 कोटी 30 लाख कॅश क्रेडीट व 70 लाखाचे टर्मलोन होते.

या कर्जासाठी त्यांच्याकडून 10 धनादेश सिक्युरिटी म्हणून घेण्यात आले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी म्हणजे जून 2019 मध्ये त्यांनी त्यांच्या कर्जखात्याची तपासणी केली. 16 जुलै 2019 रोजी बिकाजी फूडस इंटरनॅशनल या फर्मला आरटीजीएसद्वारे 26 लाख 45 हजार रुपये पाठवल्याची नोंद वगळता 8 विविध फर्मला बच्छावत यांच्या परवानगीविना त्यांच्या कर्जखात्यातून पैसे वर्ग केल्याचे त्यांना समजले. याप्रकारची त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com