अधिकार्‍यांच्या चुकीमुळे कोर्‍हाळेतील 44 नागरिक मतदानापासून वंचित

नावे समाविष्ट करा || अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार, ग्रामस्थांचा इशारा
File Photo
File Photo

राहाता |प्रतिनिधी| Rahata

कोर्‍हाळे ग्रामपंचायतीच्या मुळ मतदार यादीत अधिकार्‍यांकडून झालेल्या चुकीमुळे 44 मतदार मतदान यादीतून वगळण्यात आले आहेत. वगळण्यात आलेले 44 नागरिक हयात असून त्यांचे वास्तव्य सध्या कोर्‍हाळे गावातच आहे. तरीही त्यांची नावे मतदार यादीत न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सदरची नावे जोपर्यंत मुळ यादीत समाविष्ट होत नाही तोपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर करु नये. अन्यथा मतदानावर बहिष्कार घालू, असा इशारा कोर्‍हाळे ग्रामस्थांनी दिला आहे.

राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे ग्रामपंचायतीने प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. या मतदार यादीवर 21 ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन नागरिकांना केले होते. त्यानुसार कोर्‍हाळे येथील नागरिकांनी सदर मतदार यादीत 44 मतदारांना मुळ यादीतून वगळल्याचे तलाठी व तहसिलदार यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर तहसिलदारांनी सदरचे 44 मतदार हे डिलीट यादीत पडल्यामुळे त्यांच्यावर हरकत घेता येत नाही. मुळ यादीवर हरकत असेल तर बोला, असे सांगून या 44 मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार खुद्द तहसिलदारांकडूनच होत असल्याने कोर्‍हाळे ग्रामस्थांनी हा निवडणूक कार्यक्रमच रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी कामगार तलाठी यांच्याशी चर्चा केली असता सदरची नावे मुळ मतदार यादीत डिलीट झाली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तरी या 44 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. सध्या डिलीट झालेली ही नावे मुळ मतदार यादीत घेता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी तहसिलदारांची भेट घेतली. तहसिलदारांनीही तलाठ्यांच्याच कित्ता ग्रामस्थांपुढे गिरविला. त्यामुळे मतदार यादीतून डिलीट झालेले हे 44 मतदार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहे.

महसूल प्रशासनाने या नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करुन मगच ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा अन्यथा कोर्‍हाळे ग्रामस्थ ग्रामपंचायत निवणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा बाळासाहेब दाभाडे, दत्तात्रय डांगे, राजेंद्र कोळगे, रघुनाथ भांबारे, दिलीप कोळगे, भाऊसाहेब भांबारे, सुभाष बनसोडे, दिपक कालेकर, प्रदीप शिरोळे, किशोर ढगे, कैलास डांगे, रावजी ढगे, तुकाराम डांगे, रमेश डांगे, बिपीन बनसोडे, नानासाहेब भांबारे, उत्तम सोनवणे, पुंजाजी जाधव, जवजी भांबारे, बाळासाहेब जाधव, पोपट दाभाडे, रावसाहेब डांगे आदींसह कोर्‍हाळे ग्रामस्थांनी दिला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com