जिल्ह्यातील नागरिकांना करोना नियमांचा विसर

पोलिसांकडून 10 दिवसांत 22 लाखांचा दंड वसूल
जिल्ह्यातील नागरिकांना करोना नियमांचा विसर

अहमदनगर|Ahmedagar

जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा प्रशासनाला विनामास्कची कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलिसांनी गेल्या 10 दिवसांमध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून विनामास्क, सोशल डिस्टसिंग, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावर दंडात्मक कारवाईच्या सात हजार 271 केसेस करून 21 लाख 51 हजार 400 रूपयांचा दंड वसूल केला आहे.

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. दररोज पाचशे ते हजार नवे रूग्ण समोर येत आहे. यामुळे सक्रीय रूग्णांची संख्या पाच हजारच्या टप्प्यात आहे. सरकारने सर्व आस्थापना खुल्या केल्या असल्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढली आहे. करोना प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याने व करोना रूग्णसंख्या कमी होत असल्याचा समज नागरिकांच्या मनात आहे. यामुळे विनामास्क फिरणार्‍यांची संख्या वाढली आहे. 10 दिवसांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्ह्यातील करोना उपाय योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करून तिसरी लाट अहमदनगर जिल्ह्यातून येण्याची भिती देखील व्यक्त केली. विनामास्क, सोशल डिस्टसिंग, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या कारवाई अधिक कडक करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ठिकठिकाणी नाकाबंदी करून विनामास्कवर कारवाई अधिक कडक करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पोलिसांकडून प्रत्येकी 200 रूपये दंड वसूल केला जात आहे. 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत जिल्हा पोलिसांनी दोन हजार 249 विनामास्कच्या केसेस करून 11 लाख 21 हजार 500 रूपयांचा दंड वसूल केला. तसेच सोशल डिस्टसिंगच्या तीन हजार 710 केसेस करून सात लाख 72 हजार 100 रूपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या एक हजार 312 केसेस करून दोन लाख 57 हजार 800 रूपये दंड वसूल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारवाईला नागरिकांचा विरोध

गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांकडून करोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. करोना रूग्णसंख्या कमी होत आहे. लसीकरण झाले आहे. तर मग मास्क कशासाठी घालायचे, असे म्हणत पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईला नागरिकांकडून विरोध केला जात आहे. कारवाईदरम्यान हुज्जत घातली जात आहे.

सर्वसामान्यांवरच कारवाई का?

पोलिसांकडून चौकाचौकात नाकबंदी करून दुचाकी, चारचाकीतून प्रवास करणार्‍यांच्या चेहर्‍यावर मास्क आहे का, याची तपासणी केली जाते. नसल्यास कारवाई केली जात आहे. परंतु, अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम होत आहे. अनेक प्रतिष्ठित लोकांकडून आता मास्कचा वापर केला जात नाही. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. फक्त सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com