देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी परिसरात चिकनगुण्या, डेंग्यूसदृश आजाराने नागरिक हैराण

नगरपालिका व आरोग्य यंत्रणेचे सपशेल दुर्लक्ष
देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी परिसरात चिकनगुण्या, डेंग्यूसदृश आजाराने नागरिक हैराण

देवळाली प्रवरा (वार्ताहर)

देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात ऐन पावसाळ्यात चिकनगुण्या, डेंग्यू, हिवताप यासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. साथीच्या आजाराच्या विळख्यात अनेक नागरिक सापडले आहेत.

या आजारावर उपचार घेण्यासाठी नागरिक राहुरी, श्रीरामपूर येथे वैद्यकीय मदत घेण्यासाठी दवाखान्यात दाखल झाले आहेत. या उद्भवलेल्या परिस्थिती कडे आरोग्य यंत्रणेचे अजिबात लक्ष दिसत नाही. आरोग्य यंत्रणा करोना लसीकरणामध्ये व्यस्त असल्याचे दाखवून नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार त्वरीत थांबवून साथीच्या आजाराकडे लक्ष घालावे. अन्यथा आरोग्य यंत्रणेला जाग येण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व गावागावात करोना महामारीने कहर केला होता. मात्र, करोनाच्या नावाखाली परिसरातील आरोग्य यंत्रणा निर्ढावलेल्या अवस्थेचे चित्र परिसराला पाहायला मिळत आहे. गेल्या तीन, चार महिन्यापासून सुरु असलेल्या कधी दमदार तर कधी रिमझिम पावसाने परिसरातील वाड्यावस्त्यासह शहरात अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत व रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. तर अनेक ठिकाणी डबक्यात पाणी साचलेले आहे. त्यातच पावसाच्या पाण्याची त्यात भर पडत असल्याने यामध्ये डासाचे थवेच्याथवे निर्माण झाले आहेत. परिसरातील दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी डासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. परिसरातील शेटेवाडी, कारवाडी, इस्लामपूरा, गणेशनगर, लाखवाट, मुसमाडे वस्ती, भांड, सांगळे वस्ती, गणपती चौक, कदम वस्ती, बिरोबानगर, देवळाली बंगला, राहुरी फॅक्टरी आदीसह परिसरात सर्दी खोकला, चिकनगुण्या, मलेरिया, हिवताप, डोकेदुखी, सांधेदुखी यासारख्या आजाराने शेकडो रुग्ण आजारी पडले आहेत. शहरातील खासगी डॉक्टर व औषध विक्रेते या आजाराच्या विळख्यात सापडल्याने त्यांच्यावरच उपचार घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शहरासह परिसरासाठीची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली असून या यंत्रणेचे बारा वाजले आहेत.

नागरिकांच्या आरोग्याची वेळीच दखल घेण्यासाठी शहरात नगरपरिषद कार्यालयाजवळ जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्राचा विस्तार मोठा आहे. या ठिकाणी मोठा सेवक वर्ग कामाला आहे. या ठिकाणी सर्व सोईसुविधा आहेत. परंतु या ठिकाणी असलेले अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या सेवे बाबत कायमच उदासिन असतात. या ठिकाणी कायम औषध व गोळ्यांचा वाणवा असतो. कायमच नागरिकांना बाहेर गोळ्या घेण्याचा येथील वैद्यकीय अधिकारी सल्ला देतात. मग शासनाकडून येणारी लाखो रुपयांची औषधे जातात कुठे? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. ठराविक काही कर्मचारी वगळता अनेक कर्मचारी उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम करतांना दिसून येतात. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारीही केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या साथीच्या आजाराचे आरोग्य यंत्रणेने शहरासह वाड्यावस्त्यावर जाऊन आजारी व्यक्तीच्या रक्ताचे नमूने घेऊन तात्काळ उपाययोजना सुरु करावी.

डास निर्मूलनासाठी व साथीचे आजार रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने परिसरात पावसाळा सुरु झाल्यापासून वाढलेल्या गवतावर तणनाशक व साचलेल्या डबक्यामध्ये किटकनाशकाची फवारणी केली असली तरी साथीच्या आजाराचे थैमान थांबविण्यासाठी कुठल्याही प्रकारची ठोस उपाय योजना राबवली नसल्याने शेकडो नागरिक साथीच्या आजाराने आजारी पडले आहेत. याकडे नगरपरिषदेने देखिल गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी व येथील आरोग्य केंद्र हे असून अडचण नसून खोळंबा असून या आरोग्य केंद्रातील अनेक वर्षे एकाच ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करण्याची मागणी शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com