थेट नियंत्रण कक्षात येवून रेमडेसिवीर अन् ऑक्सिजनची नागरिकांकडून मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयातील करोना नियंत्रण कक्ष नामधारी
 थेट नियंत्रण कक्षात येवून रेमडेसिवीर  
अन् ऑक्सिजनची नागरिकांकडून मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यात करोना रूग्णसंख्या वाढत असल्याने वाढत्या रूग्णांना रेमडीसिवीर आणि ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. रूग्णांना रेमडेसिवीर व ऑक्सिजन संदर्भात काही अडचण आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

परंतू, हा कक्ष फक्त नावालाच असल्याचे चित्र दिसून येत आहे. कक्षात फोन करून तक्रारीचे निवारण न झाल्याने नागरिकांनी कक्षात येऊन तेथील अधिकार्‍यांना धारेवर धरत टाहो फोडल्याचे चित्र शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले.

जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये सहा हजारांच्यावर रूग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले. वाढती रूग्णसंख्येवर उपचार करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. ठिकठिकाणी कोविड सेंटर सुरू केले असले तरी रूग्णांना बरे होण्यासाठी संजवनी ठरणार्‍या रेमडीसिवीर इंजेक्शनचा खडखडात झाला आहे.

रेमडीसिवीर पाठोपाठ आता ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. जिल्ह्याला सध्या दररोज 50 टन ऑक्सिनची गरज लागते. मात्र, पुरवठा केवळ 30 ते 35 टक्केच होत आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांत मिळून हा ऑक्सिजन वापरला जात आहे.

नगरच्या एमआयडीसीमध्ये तीन छोट्या कंपन्या असून त्यांची उत्पादन क्षमता मर्यादित आहे. यामुळे रूग्णांना ऑक्सिजन देण्यास रूग्णालयांनी हात ठेकले आहे. रूग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात येवून मदतीसाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांकडे इंजेक्शन, ऑक्सिजनची मागणी करत आहे. कक्षातील अधिकार्‍यांकडून मात्र त्यांच्या तक्रारीचे निवारण होताना दिसत नसल्याचे एकंदरीत चित्र आहे.

.................

ऑक्सिजनवरून वाद

करोना रुग्ण वाढत असताना ऑक्सिजन, रेमडीसिवीरचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात जो साठा उपलब्ध आहे. त्यातील शासकीय रुग्णालयाला किती ठेवायचा आणि खाजगी रुग्णालयांना किती द्यायचा यावरून प्रश्‍न निर्माण होताना दिसत आहे. शुक्रवारी ऑक्सिजनच्या एका टँकरमधील ऑक्सिजन वाटपावरून वाद झाल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या एका टँकरमधील ऑक्सिजनच्या वाटपावरून खाजगी डॉक्टर्स आणि जिल्हा रुग्णालयात वादा झाला. उपलब्ध झालेल्या एक टँकर जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात आल्यानंतर तो तिथेच संपूर्ण खाली करून घेतला जाणार असल्याची माहिती खाजगी कोविड हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांना समजली. यानंतर खाजगी डॉक्टरांनी एकत्र येत विरोध केला, यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत खाजगी डॉक्टरांनी ऑक्सिजन मिळाला नाही तर आम्हाला कोविड रूग्ण ऍडमिट कसे करून घेता येतील असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. दरम्यान, या वादाबाबत सरकारी अथवा खासगी डॉक्टर यापैकी कोणाकडूनच दुजोरा मिळाला नाही. मात्र, काल दिवसभर या विषयी चर्चा सुरू होती.

.......................

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com