चर्चच्या जागेवर अतिक्रमण करून राहात असलेल्या व्यक्तीला हटवा; पाचेगाव येथे उपोषण

चर्चच्या जागेवर अतिक्रमण करून राहात असलेल्या व्यक्तीला हटवा; पाचेगाव येथे उपोषण

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव ग्रामपंचायतीने धर्ममंदिरासाठी (चर्च) दिलेल्या जागेत अतिक्रमण करुन तिचे स्वतःचे घर बनविले असून आम्ही वर्गणी करुन बांधलेल्या या चर्चमधून सदर व्यक्तीला बाहेर काढण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय तुवर, हिंदू एकता पक्षाचे चिलिया तुवर व अशोक मोरे यांनी ग्रामपंचायतीशेजारी उपोषण सुरु केले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, आमच्या गावात अनेक वर्षांपासून एक ख्रिश्चन धर्ममंदिर चर्च आहे. हे धर्म मंदिर कोणत्याही संस्थेचे नसून समाजबांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयाला चर्च बांधण्यास जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करून जागा घेतली होती. वर्गणी करुन चर्च उभारण्यात आले. यावर कोणत्याही एका संस्थेचा किंवा कोणाचाच अधिकार नाही. या चर्चवर गावातील स्वयंघोषित धर्मगुरू डॅनियल शालिमान देठे याने व कुटुंबाने समाजबांधवांना दमबाजी करत अतिक्रमण करून आपले स्वतःचे घर बनविले. त्याला समज देऊन तू येथे राहू नको असे सांगितले असता खोटे अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करेल, अशी धमकी दिली.

या चर्चमधून त्याला बाहेर काढा. आमच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्याच्यावर तात्काळ भादंवी कलम 295 (अ)प्रमाणे गुन्हा दाखल करावा. चर्च मधील मौल्यवान वस्तू गायब (चोरी)झाल्याबद्दल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्याला दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही सामाजिक कार्यकर्ते उपोषण करीत आहोत.

1997 साली ग्रामपंचायतीने आम्हाला चर्चसाठी जागा दिली होती. सदर जागा चर्चच्या नावावर होती पण ग्रामपंचायतीने ही जागा नोंद आपल्या दप्तरातून गायब केल्याचा माझा आरोप आहे. आमच्या चर्चमध्येही त्याचा पुरावा आमच्याकडे होता. पण 2006 साली आलेल्या पुरात आमच्या चर्चमध्ये पाणी घुसले होते. त्यात सर्व पुरावे नष्ट झाले. चर्चमध्ये दर रविवारी पूजाअर्चा होते. माझी आमच्या एका संस्थेने नेमणूक केली आहे. तरी माझे सर्व पुरावे मी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सादर करणार आहे.

- डॅनियल शालिमान देठे, चर्च सेवेकरी, पाचेगाव

आम्ही 1994पासून ग्रामपंचायत दप्तरी पाहणी केली असता आम्हाला कोणताही पुरावा व ठराव त्या जागेचा मिळून आला नाही. आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाने त्याला खुलासा मागणीसाठी पत्रव्यवहार केला आहे. आम्ही चर्चमध्ये सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व मी स्वतः समक्ष पाहणी केली असता आम्हाला तेथील वास्तव्यात सर्वांना त्याचा प्रपंच आढळून आला.पुरावा सादर केल्यानंतरच ग्रामपंचायत प्रशासनाला काही ठोस निर्णय घेता येईल.

- शिवाजी वाहुरवाघ, ग्रामविकास अधिकारी पाचेगाव

Related Stories

No stories found.