नाताळ सुट्टीत शिर्डीत लाखो भाविकांची गर्दी

वाहतुकीची कोंडी, संस्थान कर्मचारी व पोलीस यंत्रणेची दमछाक
नाताळ सुट्टीत शिर्डीत लाखो भाविकांची गर्दी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नाताळ सुट्टीनिमित्त शिर्डीत लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली. साईंच्या जयघोषात शिर्डी दुमदुमली. साईभक्तांच्या गर्दीने महामार्गावर वाहनांची कोंडी झाली. संस्थान कर्मचारी व पोलीस यंत्रणेची मात्र नियोजन करताना मोठी दम छाक झाली.

नाताळनिमित्त साई भक्तांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. शहरातील प्रत्येक चौका चौकात गल्लीमध्ये, दर्शन रांगेत, भाविक मोठ्या संख्येने दिसून येत होते. शिर्डीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने साईबाबा मंदिर व परिसरात देणगीतून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नवीन दर्शन रांग व साईबाबा रुग्णालय वरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दरवर्षी नाताळ सुट्ट्यामध्ये शिर्डीला देश विदेशातील साईभक्त मोठ्या संख्येने येतात. करोना नंतर यावर्षी साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत झाली आहे. शाळेंना नाताळाच्या सुट्ट्या तसेच शनिवार व रविवार ही सुट्टी जोडून आल्यामुळे शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. लाखो भक्तांच्या गर्दीने साईनगरी फुलून गेली आहे. नाताळ तसेच सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांची प्रत्येक वर्षी शिर्डीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल लॉज, विद्युत रोषणाईने फुलले आहे. साई संस्थान, पोलीस प्रशासन, शासकीय प्रशासन, एसटी महामंडळ, नगरपरिषद प्रशासन यांनीही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन केले आहे. गर्दी काळात साई भक्तांचे आरोग्यासाठी आरोग्य व्यवस्था ही करण्यात आली आहे.

शिर्डीत साई दर्शनासाठी येणार्‍या नागरिकांमुळे वाहनांची ही वर्दळ वाढली आहे. ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसते. कोरोनाचा इतर देशात प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक साईभक्त पुन्हा मास्क वापरताना दिसत आहेत. शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने शनिशिंगणापूर येथील श्रीशनेश्वर डेकोरेटर्स गणेश शेटे यांनी श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात तसेच साईबाबा रुग्णालय येथेही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

सुनील बाराहाते, साई समर्थ इलेक्ट्रिकल शिर्डी यांनीही नवीन दर्शन रांग इमारत येथे विनामूल्य विद्युत रोषणाई केली आहे. साई संस्थांनचे सर्व निवासस्थाने हाउसफुल होती. खाजगी हॉटेल लॉजही भाविकांनी हाउसफुल झाले होते. रेल्वे, एसटी, खाजगी बसेस खाजगी प्रवासी वाहतूक ही मोठ्या प्रमाणात येथे सुरू होती. ठिकठिकाणी वाहतुकीची वर्दळीमुळे कोंडी होताना दिसत होती.

गर्दीमुळे दर्शन घेण्याकरिता उत्सव तसेच सुट्ट्यांमध्ये भक्तांना अनेक तास उभे राहावे लागते. भक्तांना तात्काळ दर्शन व्हावे याकरिता साईबाबा संस्थानने अद्यावत दर्शन रांग उभारली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी या दर्शन रांगेचे उद्घाटन करणार आहे. नव्याने उभारण्यात आलेली दर्शन रांग सुरू झाल्यानंतर गर्दीच्या काळातही भाविकांना सुलभ दर्शन घेता येईल. त्यामुळे साई भक्तांमध्ये दर्शन रांग सुरू होण्याची उत्सुकता वाढली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com