गाडीचा कट मारल्याच्या कारणावरून चॉपरने वार
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
गाडीचा कट मारल्याच्या कारणावरून चौघा तरूणांवर धारदार चॉपरने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. शहरातील म्हाडा कॉलनी येथे रात्री 9.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत जखमी झालेल्या अली जाकीर पठाण (वय 17, धंदा कार डेंटींग-पेन्टींग, रा. संजयनगर, वार्ड. नं. 2, श्रीरामपूर) या तरुणाने शहर पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, मी व मित्र अदनान शेख व जावेद शाह असे एका गाडीवरून कामावरून घराकडे जात असताना म्हाडा कॉलनी येथे सुरज यादव याने गाडीला कट मारला तेव्हा मी म्हणालो की, गाडी दिसत नाही का? याचा राग आल्याने त्याने मला व मित्रांना शिवीगाळ करत आरोपींनी धारदार चॉपरने वार केले.
डोक्यावरचा वार हुकवला तेव्हा डाव्या खांद्याला वार लागला. जावेद शाह, अदनान शेख यांनाही चॉपरने वार करून जखमी केले. यावेळी इतरांनीही लाथाबुक्क्यांंनी मारहाण करून लोखंडी रॉड, बेल्टने मारहाण केली. यावेळी लोक जमले असता आरोपींनी चॉपरने पाठीवर वार करत तन्वीर शेख यालाही मारहाण केली व दुचाकी गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले.
या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत सुरज यादव, गणेश गिते, सुजीत काळे, सनी काळे, शुभम यादव व इतर 8 जणांविरूद्ध भादंवि कलम 307, 143, 147, 148, 149, 324, 504, 506, 427, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम 7 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक़ विठ्ठल पाटील हे इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस उपअधीक्षक़ संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली.