क्लोरोहायड्रेट पावडरपासून बनविल्या जाणार्‍या ताडीमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात

क्लोरोहायड्रेट पावडरपासून बनविल्या जाणार्‍या ताडीमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर व परिसरातील काही ताडी विक्री दुकानातून खुलेआम बनावट ताडीची विक्री केली जात आहे. ही बनावट ताडी क्लोरोहायड्रेट पावडर पासून बनविली जात असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली. ही बनावट ताडी पिल्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या व्यवसायातून ताडी विक्री करणारे दररोज हजारो रुपयांचा नफा कमवत आहे. यातून दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

संगमनेर तालुक्यात ताडी विक्री व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे. पूर्वी ओरिजनल ताडी मिळायची. शुद्ध ताडी शिंदोडीच्या झाडापासून तयार केली जाते. अकोले तालुक्यातील राजूर परिसरातील डोंगरामध्ये ही झाडे अस्तित्वात आहे. या झाडांची ताडी संगमनेर तालुक्यात आणण्यात येते. ही ताडी एका माठात ठेवण्यात येते. 24 तासानंतर ती पिण्यास योग्य होते. यामध्ये नंतर पाणी मिसळण्यात येते. ही ओरिजनल ताडी असते मात्र संगमनेर शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ओरिजनल ताडीची विक्री केली जात नाही. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे शासनमान्य तडीचे दुकान आहे. याशिवाय शहरातील नाटकी नाला परिसरात असेच एक दुकान अस्तित्वात आहे. ओरिजनल ताडीची विक्री करण्याऐवजी बनावट ताडीची विक्री करून हजारो रुपयांचा नफा हे दुकानदार दररोज मिळवत आहे.

संगमनेर तालुक्याच्या सीमारेषेवरील बेल्हे या गावातून ताडीमध्ये टाकण्यासाठी एक पावडर आणली जाते. क्लोरोहायड्रेट नावाची ही पावडर आहे. या पावडरमध्ये अन्य केमिकल टाकण्यात येते. वीस पैशाच्या पावडर पासून वीस रुपयांची कमाई केली जाते. बनावट ताडी पिल्यामुळे अनेक जणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाय दुखणे, मळमळ होणे, चक्कर येणे असे विकार ताडी पिणार्‍यांना होत आहे. काही वर्षांपूर्वी अहमदनगर येथे बनावट ताडी पिल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. संगमनेर शहरातही वीस वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता असे असतानाही संगमनेर शहरात खुलेआम बनावट ताडीची विक्री केली जात आहे.

बनावट ताडी पिल्यामुळे आरोग्याला मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे मात्र शहरात सुरू असलेल्या या व्यवसायाकडे उत्पादन शुल्क व अन्न भेसळ खाते व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अर्थपूर्ण तडजोडीमुळे या व्यवसायाकडे संबंधित अधिकार्‍यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

ही आहे ओरिजनल ताडी जी संगमनेर शहरामध्ये क्वचितच मिळते. संगमनेर मध्ये मिळणार्‍या ताडीचा रंग पांढर्‍या ऐवजी पिवळसर असतो. पावडर मिक्स करून बनविलेली बनावट ताडी जीव घेणे ठरण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com