चितळी करोनामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्या - शेवाळे

आजपासून गाव 5 दिवसासाठी संपूर्ण लॉकडाऊन
चितळी करोनामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्या - शेवाळे

चितळी |वार्ताहर| Chitali

राहाता तालुक्यातील चितळी गाव करोनामुक्त करण्यासाठी करोना निवारण समिती, आशा वर्कर तसेच सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सर्वे करून गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची रॅपिड टेस्ट करून घेण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी केले. तसेच यावेळी आज बुधवारपासून 5 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चितळी येथे करोनाच्या कहर वाढल्याने आतापर्यंत 60 पेक्षा अधिक नागरिक करोना संक्रमनाने निधन झाल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मधुकर साळवे, वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख स्वाती बच्छाव, पंचायत समिती माजी सदस्य अ‍ॅड. अशोकराव वाघ, उपसरपंच नारायण कदम, ग्रामविकास अधिकारी मधुकर दहिफळे, सदस्य रुपेश गायकवाड, राजू वाणी, अमर सुरुडे, अतुल चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. अशोकराव वाघ यांनी येथील नागरिकांच्या विविध प्रकारच्या अडचणी प्रामुख्याने कशा सोडविता येतील यासाठी कार्यवाही करावी तसेच कोविड सेंटर येथे उभारता येईल का? यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगून पोलीस निरीक्षक साळवे यांना प्रथम येथील या अवैध दारू विक्री करणार्‍यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन यावेळी केले. चितळी येथील सध्याची येथील नागरिकांची करोनामुळे झालेली परिस्थिती पाहता नागरिकांनी स्वतः टेस्टसाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी वाकडी आरोग्य केंद्राच्या प्रमुख स्वाती बच्छाव यांनी केले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी दहिफळे यांनी सांगितले की, येथील आशा वर्कर तसेच आरोग्य सेविका यांना ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करुन पाच दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे सांगितले.

बैठकीत आरोग्य सेविका कल्पना बनसोडे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, चितळी आसवणीचे संजय धोत्रे, बाळासाहेब वाघ, चंद्रकांत वाघ, सुरेश वाघ, किशोर वाघ, संदीप भोसले, सतीश गायकवाड, शिवाजी कदम, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. आभार अशोक वाणी यांनी मानले.

आ. आशुतोष काळे यांच्याकडून 300 किट

आ. काळे यांनी रॅपिड अँटीजन किटचा तुटवडा होऊ नये म्हणून येथील आरोग्य केंद्रास 300 किट उपलब्ध करुन देण्यात आल्या. तसेच कुणाला अ‍ॅडमिटची गरज भासल्यास साईबाबा तपोभूमी येथे कोविड सेंटरमध्ये दाखल होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अ‍ॅड. अशोकराव वाघ यांनी आसवणीच्या अधिकारी वर्ग समवेत चर्चा घडवून येथील आसवणीच्यावतीने विलगिकरण केलेल्या रुग्णांसाठी चहा, नाश्ता, जेवण, बेड यांचा स्वखर्चाने पुढाकार घेतला असून लवकरच सुविधा कार्यन्वित होणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com