अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून 16 तारखेला या वार्डाची प्रारूप मतदारयादी प्रसिध्द केली जाणार आहे.

छिंदम कोर्टात गेला असला तरी कोर्टाने निवडणुकीला स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे ही प्रक्रिया सुरू झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याची क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर छिंदमच्या अपात्रतेचा ठराव महासभेत झाला. शासनाने त्याच पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात तो कोर्टात गेला आहे.

मात्र छिंदम अपात्र ठरल्याने पद रिक्त असून निवडणूक घेण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने आयोगाला पूर्वीच पाठविला होता. आयोगाने नगरसह राज्यातील तीन महापालिका व रिक्त जागांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून त्यात नगरच्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.

आयोगाच्या वेळापत्रकानुसार 16 फेबु्रवारीला प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. शहरातील तोफखाना भागात असलेल्या 9 नंबर वार्डाची यादी याच दिवशी जाहीर केली जाईल. त्यानंतर त्यावर हरकती, सूचना मागविल्या जाणार आहेत. मतदार यादी अंतिम झाल्यानंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

म्हणून निवडणूक प्रतिष्ठेची

जूनमध्ये होणार्या महापौर पदाच्या निवडणुकीची किनार या पोटनिवडणुकीला असणार आहे. पुढचे महापौर पद हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. 9 नंबर वार्डात पोटनिवडणूक होत असलेली जागा ही ओपन आहे. त्यामुळे या जागेवर अनुसूचित जाती महिलेला उमेदवारी देवून तिला महापौर पदाचे दावेदार म्हणून घोषित केले जाऊ शकते. ही पार्श्वभूमी पाहता या पोटनिवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त होईल, असे चित्र दिसू लागले आहे.

उमेदवारीचे आडाखे

डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत या वार्डात 17 हजार 380 मतदार होते. भाजपकडून प्रदीप परदेशी, मनसेकडून पोपट पाथरे, राष्ट्रवादीकडून राजेंद्र राठोड आणि शिवसेनेकडून सुरेश तिवारी यांनी छिंदम विरोधात निवडणूक लढविली होती. मात्र या सगळ्यांचा पराभव करत श्रीपाद छिंदमने विजयाचा गुलाल घेतला होता. आता या वार्डात छिंदम स्वत: निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे इतर पक्षातील उमेदवार कोण असतील याचे आडाखे आतापासून बांधले जात आहेत.