
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा नदीपात्रात बेकायदा बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. गेल्या 15 दिवसात बाहेरील वाळू तस्करांनी बोटीनेच वाळू उपसा करून सुमारे 2 हजाराहून अधिक ब्रासचा वाळू उपसा केल्याने राहुरीचा महसूल बुडाला आहे.
दरम्यान, याबाबत ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले असून त्या बेकायदा वाळू उपशाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने महसूलची भूमिका संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. तेथील बोट ताब्यात घेऊन तातडीने ही वाळू तस्करी बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
चिंचोली परिसरातील प्रवरा नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून चक्क बोटीच्या सहाय्याने रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे. त्याकडे महसूल प्रशासनाने डोळेझाक केली आहे. वाळू तस्करांचे काही पंटर या परिसरात रात्री-अपरात्री फिरत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वाळू तस्करीला विरोध करणार्यांना चक्क गावठी कट्टे दाखविण्यात येत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
या परिसरातून रात्रंदिवस वाळूने भरलेले ढंपर बेफाम वेगाने गावातूनच जात असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नदीपात्रातून वाळू उपसा करून तो लगतच्या काही शेतकर्यांच्या शेतात टाकण्यात येत असून तेथून तो साठा अन्यत्र हलविण्यात येत आहे. यावर नागरिकांनी महसूल प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. वाळू तस्करीकडे महसूल प्रशासनाचा कोणताही अधिकारी फिरकत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आता नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून वाळू तस्करीची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून प्रवरा नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी अज्ञात वाळू तस्करांनी बोट आणली आहे. मात्र, त्या बोटीचा मालक कोण? याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. या बोटीचा वापर सर्रास वाळू उपशासाठी केला जात आहे. एवढी मोठी बोट कोणी आणली? केव्हा आणली? याबाबत मात्र, नागरिक आणि महसूल प्रशासन अनभिज्ञ असून प्रशासनाने ही बोट ताब्यात घ्यावी, अशी मागणी होत आहे.