राहुरीत चायना मांजाने पाच वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी

राहुरीत चायना मांजाने पाच वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे स्वरा चाकणे ही पाच वर्षीय मुलगी तिच्या वडिलांसोबत मोटरसायकलवरून जात असताना चायना मांजाने गळा कापून ती गंभीररित्या जखमी झाल्याची घटना 10 जानेवारी रोजी घडली आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील गोविंद वसंत चाकने व त्यांची पाच वर्षीय मुलगी स्वरा हे राहुरी शहरातील त्यांचे नातेवाईक संजय गुलदगड यांच्याकडे आले होते. 10 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान स्वरा व तीचे वडील मोटरसायकलवर वांबोरी येथे घरी परत जात असताना राहुरी खुर्द येथेच माऊलाई मंदिरा समोरील रस्त्यावर चायना मांजा स्वरा हिच्या गळ्याला अडकून गळा कापला गेला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली.

तिच्यावर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून आज दिनांक 11 जानेवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. येत्या 15 जानेवारीला मकरसंक्रांत हा उत्सव असून तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग व चायना मांजाची दुकाने लागली आहेत. चायना मांजावर प्रशासनाकडून बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणावर चायना मांजाची अनाधिकृतपणे विक्री होत आहे. याकडे राहुरीचे पोलीस मात्र, बघ्याची भुमिका घेत आहे.

चायना मांजाने अपघात होऊन अनेकजण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिस व महसूल प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे चायना मांजाची दुकाने वाढली असून मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याचे चिन्ह दिसत आहेत. महसूल व पोलीस प्रशासनाने तालुक्यात व शहरात विक्री होत असलेल्या चायना मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com