अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या चिल्लर घोटाळ्यात आरोपी आशुतोष सतीश लांडगे याला नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयाने 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अर्बन बँकेत एकूण तीन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे मुख्य शाखाधिकारी मारूती रंगनाथ औटी यांनी 22 डिसेंबर 2020 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आशुतोष लांडगे याच्यासह बँकेतील इतर अधिकारी व संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी घनश्याम अच्चुत बल्लाळ, प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र विलास हुंडेकरी व स्वप्निल पोपटलाल बोरा यांना अटक केली आहे.

अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील अपहार प्रकरणात लांडगे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. त्याला नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने हस्तांतरित करून घेतले आहे. या गुन्ह्यात लांडगे याची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, या गुन्ह्यात बँकेच्या इतर संचालकांकडे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस चौकशी करणार आहेत.