बालसंगोपनच्या लाभार्थ्यांना आता मिळणार दरमहा 2500 रुपये

बालसंगोपनच्या लाभार्थ्यांना आता मिळणार दरमहा 2500 रुपये

अकोले |प्रतिनिधी| Akole

गेली कित्येक महिने करोना एकल समितीने पाठपुरावा केल्यामुळे महाराष्ट्रातील बालसंगोपन योजनेच्या 54000 लाभार्थीं मुलांना यापुढे दरमहा 1125 रुपयांऐवजी आता 2500 रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच करोना एकल महिलांना रोजगारासाठी पंडिता रमाबाई व्याजमाफी योजनेंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून दोन वर्षांसाठी एक लाख रूपये बिनव्याजी मिळणार आहेत. महाराष्ट्रातील हजारो विधवा महिलांसाठी हा अतिशय आनंददायी निर्णय असल्याचे करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले. विधानसभेत महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अलीकडेच ही घोषणा केली.

मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये अजित पवार यांनी 1125 ची रक्कम 2500 केली पण शासन आदेश निघू शकला नाही व सरकार बदलताच नव्या सरकारने त्याला स्थगिती दिली. त्यानंतर करोना एकल महिला पुनर्वसन समितीने सतत पाठपुरावा निवेदने दिली. विधानपरिषद उपसभापती निलम गोर्‍हे यांनी यावर बैठक घेतली. यासाठी समितीचे कार्यकर्ते मिलिंद साळवे व अशोक कुटे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासोबत ही मिलिंद साळवे यांनी बैठक घेतली. अजित पवार यांनाही ठिकठिकाणी समितीच्या वतीने निवेदने दिली गेली होती.

याबाबत शरद पवार यांनी जाहीरपणे सरकारवर नाराजी व्यक्त केली. या सर्वाचा परिणाम म्हणून एकूण 54 आमदारांनी करोना विधवा महिलांच्या समस्या व बालसंगोपन योजनेवर प्रश्न विचारले होते. वर्तमान पत्रांतून याविषयी मोठी जागृती झाल्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे.

करोना विधवा महिलांना बिनव्याजी कर्जयोजना असावी म्हणून समितीच्या वतीने मागणी केली होती. त्यासाठी पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना आली होती. पण या सरकारने स्थगिती दिली होती. पण आता या महिलांना बिनव्याजी एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे..

या दोन्ही निर्णयांबद्दल सरकारचे अभिनंदन करताना 81 तालुक्यांतील कार्यकर्ते सतत पाठपुरावा करत होते. त्याचा परिणाम म्हणून या महिलांचे अनेक विषय मार्गी लागत असल्याबद्दल समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com