बालविवाह प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
Crime

बालविवाह प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील शिरसाटवाडी येथील बालविवाह प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी आठ आरोपींना शनिवार (दि.28) रोजी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. शिरसाटवाडी गावच्या ग्रामसेविका अर्चना सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी मुलीचा बालविवाह केल्याच्या आरोपावरून पाथर्डी पोलिसांनी मुलीचा पती, सासरा, सासू, मुलीचे वडील यांच्यासह 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लग्न लावणारे पुरोहित, मंडप, सजावटकार तसेच विवाहास उपस्थित असणार्‍या 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील मर्जी संघटना व नगरमधील चाईल्ड लाईन संघटना यांनी या विवाहाची माहिती पोलीस व पाथर्डीतील शिरसाटवाडीच्या सरपंचांना दिली होती. यासंदर्भात शिरसाटवाडीच्या ग्रामसेविका अर्चना सानप यांनी पाथर्डी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

हा बालविवाह बुधवारी (दि.25) शिरसाटवाडी गावातील भैरवनाथ मंदिरासमोर झाला.त्यानंतर शुक्रवारी मुलीच्या वयाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीचे वय 14 वर्ष 2 महिने 7 दिवसांचे आहे तर मुलगा 21 वर्षांचा आहे. मुलाचे वडील शहादेव मच्छिंद्र शिरसाट, मुलगा सागर शिरसाट, मुलाची आई, (नाव माहित नाही) मुलीचे वडील सुनील आव्हाड रा.रांजणी, पाथर्डी तसेच लग्न लावणारे पुरोहित (नाव माहित नाही) लग्नासाठी मंडप टाकणारे व मोटार सजावट करणारे (नाव माहित नाही) आणि शिरसाटवाडी व रांजणी या दोन्ही गावातील 20 ते 25 जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर रोकडे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com