अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणे भोवले

चौघांविरूध्द पोलिसांत गुन्हा
Crime
Crime

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, चाईल्डलाईन संस्था व तोफखाना पोलिसांनी सावेडी उपनगरात धाडसत्र राबवून सहा बालकामगारांची सुटका केली. याप्रकरणी संबंधीत अस्थापना प्रमुखांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी यास्मीन अब्दुलगणी शेख (वय 41 रा. बागडे मळा, बालिकाश्रम रोड) यांनी फिर्यादी दिल्या आहेत.

प्रोफेसर कॉलनी येथील जॉगींग ट्रक येथील नगरचा डबेवाला याच्याकडे एक बालकामगार मिळून आला. या प्रकरणी नगरचा डबेवाला आदित्य कांतीलाल त्रिमुखे (वय 26 रा. सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. कुष्ठधाम रोड, सोनानगर चौक येथील चायनीज कार्नरचा मालक मनोज सुरेश बोज्जा व विशाल बहिरू धात्रक यांच्या आस्थापनेत दोन बालकामगार मिळून आले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिस्तबाग चौकातील पार्वती कॉर्नचा मालक योगेश रमेश शेरकर (वय 35) याच्या आस्थापनेत दोन बालकामगार मिळून आले.

शेरकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनानगर चौकातील डेक्कन चायनीज फास्टफूडचा मालक रोशन लांबा (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या अस्थापनेत एक बालकामगार मिळून आला. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, नगर चाईल्डलाईन शाखा, बालकामगार कृती दलाचे सर्व सदस्य, चाईल्ड लाईन संस्थेचे महेश सुर्यवंशी, बाळू साळवे, जिल्हा माहिती व बालविकास कार्यालयाचे प्रतिनिधी, पोलीस उपनिरीक्षक नितीन कानगुडे, अंमलदार अमोल आव्हाड, धिरज अभंग आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com