बालसंगोपन योजनेचे अनुदान नियमित द्यावे

महिला व बालविकास आयुक्तांना निवेदन
बालसंगोपन योजनेचे अनुदान नियमित द्यावे

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

आई किंवा वडील गमावलेल्या बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या बालसंगोपन योजनेचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना दरमहा देण्यात यावे, अशी मागणी करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी महिला व बालविकास आयुक्तांना दिलेल्या नविदनाद्वारेे केली आहे.

महाराष्ट्राचे महिला व बालविकास आयुक्त राहुल रंजन महिवाल यांची नुकतीच पुणे येथे भेट घेऊन श्री. साळवे यांनी निवेदन देऊन आयुक्तांशी चर्चा केली. निवेदनाची दखल घेऊन संबंधितांना सूचना व आदेश देण्यात येतील, असे सांगत आयुक्त श्री. महिवाल यांनी यावेळी सकारात्मक भूमिका घेतली.

आई किंवा वडील अथवा आई-वडील असे दोघेही गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या शिक्षणासाठी बालसंगोपन योजना राबवली जाते. करोनाच्या महासंकटात अनेक बालकांनी आपले आई अथवा वडील गमावले आहेत. अशा एकल व अनाथ बालकांसाठी करोना एकल महिला पुनर्वसन समितीच्यावतीने राज्यात तसेच तालुकास्तरावर जिल्हा बाल न्याय समितीची शिबिरे घेऊन जास्तीत जास्त पात्र बालकांना या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मात्र लाभ देताना लाभार्थींना दरमहा अनुदान मिळत नसल्याने व इतरही अडचणी येत असल्याने श्री. साळवे यांनी आयुक्त राहुल रंजन महिवाल यांची भेट घेऊन निवेदन दिले. बाल संगोपन योजनेला दरमहा अनुदान वाटप करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा व एकदाच तीन-चार महिन्यांचे अनुदान लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा न करता ते दरमहा जमा करण्यात यावे, अशी मागणी साळवे यांनी यावेळी केली. त्यावर बालसंगोपन योजनेला कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com