नगरच्या विकासाचा प्रस्ताव तयार करा

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या महापौर शेंडगे यांना सूचना
नगरच्या विकासाचा प्रस्ताव तयार करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरच्या विकासासाठी (Nagar Development) जे आवश्यक असणारे प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत. त्यासाठी आवश्यक त्या निधींची (Fund) तरतूद केली जाईल. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री (CM) म्हणून सदैव तुमच्या पाठिशी राहील, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी नूतन महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांना दिल्या.

महापौर शेंडगे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी नगरसेवक संजय शेंडगे आदी उपस्थित होते. महापौरपदी शेंडगे या विराजमान झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला आहे. या पदाच्या माध्यमातून नगरकरांची सेवा करून पक्ष वाढीसाठी काम करावे. त्याचप्रमाणे आघाडी धर्मही पाळावा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

शेंडगे म्हणाल्या की, शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांना विविध माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला महापौर पदाचा मान फक्त शिवसेनेमुळे मिळाला आहे. त्याचबरोबर नगर शहरात मोठ-मोठे विकास प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करून मुख्यमंत्री यांच्याकडून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com