श्रावणातही चिकनची भाववाढ तर मटनाचे दर जैसे थे

सोनगावात पोल्ट्री व्यवसाय स्थिरावला
श्रावणातही चिकनची भाववाढ तर मटनाचे दर जैसे थे

सोनगाव |वार्ताहर|Songav

श्रावण महिन्यात दरवर्षी चिकनचे दर घसरतात. यंदाही श्रावणाच्या सुरुवातीला चिकनचे दर घसरले. परंतु खवय्यांची मागणी वाढल्यामुळे श्रावणाच्या मध्यानंतर 140 रुपये किलो असलेले चिकन 160-180 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. एकीकडे ऐन श्रावणात चिकनचे दर वाढत असले तरी दुसरीकडे बोकडाच्या मटणाचे दर मात्र, 660 ते 700 रुपये किलो असे स्थिर आहेत.

हिंदू धर्मात श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात मांसाहार आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरतो. त्यामुळे आरोग्यविषयी जागरूक असलेले अनेकजण धार्मिक कारणाव्यतिरिक्त हेल्थ नीड म्हणून मांसाहार करत नाही. त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात चिकनचे दर कोसळतात. यंदाही श्रावणाच्या आधी 260 ते 280 रुपये किलोपर्यंत गेलेले चिकन श्रावण सुरू होताच 140 प्रतिकिलो रुपयेपर्यंत खाली आले. परंतु चिकनचे दर स्वस्त झाल्याने खवय्यांची मागणी वाढली.

मागणी वाढल्यामुळे 140 रुपये किलो असलेले चिकण श्रावणाच्या मध्यानंतर 160 ते 180 रुपये किलोपर्यंत पोहोचले. गेली दोन वर्ष करोनाच्या काळात पोल्ट्री व्यवसाय शेतकर्‍यांना दर कोसळल्याने मोठी झळ सोसावी लागली होती. अनेक पोल्ट्री उत्पादक शेतकरी या काळात कर्जबाजारी झाले. आता श्रावणात चिकनला मागणी वाढल्यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकर्‍यांना मात्र, थेट भाववाढीचा लाभ मिळणार नाही. कारण कंपनी शेतकर्‍यांकडून करार पद्धतीने आधीच भाव ठरवून घेते.

करारातील रेट इन्सेंटिव्हप्रमाणे दोन पैसे अधिक शेतकर्‍यांना मिळू शकतात.पूर्वी केवळ जिरायती भागात असलेला पोल्ट्री व्यवसाय आता सोनगावसारख्या बागायत भागातही पोहोचला आहे. पोल्ट्री व्यवसायातील विविध कंपन्यांच्या मदतीने या भागातही अनेक तरुणांनी पोल्ट्री व्यवसायात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपन्या देत असलेल्या फिक्स दरामुळे दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रीन बेल्टमध्ये आता पोल्ट्री व्यवसायही स्थिरावला आहे.

करोना गेल्यानंतर चिकन खाण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. शिवाय तरुण वर्गामध्ये बाराही महिने मांसाहार करण्याची पद्धत रुजू लागली आहे. काही ग्राहक चिकनचे दर कमी झाल्याने जास्त चिकनची मागणी करू लागले. अशी ग्राहकांची मागणी वाढत गेल्याने श्रावणातही चिकनची दर वाढल्याचे सोनगाव येथील चिकन विक्रेते सांगतात.

श्रावणाच्या सुरुवातीला चिकनचे दर किलोमागे 140 रुपये कमी झाले होते. परंतु निम्मा श्रावण संपत आल्यावर पुन्हा चिकनला मागणी वाढली. त्यामुळे चिकनचे दर परत 40 ते 50 रुपयांनी वाढले आहेत.

- अकबर पठाण, चिकन विक्रेते

मार्केटमध्ये होणार्‍या चिकनच्या दरवाढीचा थेट फायदा लगेच पोल्ट्री व्यवसायिक शेतकर्‍यांना होत नाही. कारण कंपन्या शेतकर्‍यांकडून करार पद्धतीने पक्षांची खरेदी करतात. त्यात पक्षी, औषधे, खाद्य, वैद्यकीय सुविधा कंपन्या पुरवित असल्याने फक्त पक्षी पालनाचा खर्च शेतकर्‍यांना मिळतो. त्यामुळे दरवाढीचा फायदा तात्काळ शेतकर्‍यांना मिळत नाही.

- नितीन अनाप, पोल्ट्री उत्पादक शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com