करोनाला गावाबाहेर रोखण्यात चिंचबन ग्रामस्थ यशस्वी

ग्रामस्थांचे निर्णय व नियमपालन इतर गावांसाठी आदर्श
करोनाला गावाबाहेर रोखण्यात चिंचबन ग्रामस्थ यशस्वी

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

नेवासा तालुक्यातील बहुसंख्य गावांसह नेवासा शहरही कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना नेवासा शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचबन गावात मात्र आजपर्यंत एकही करोना रुग्ण आढळून आला नाही. ग्रामस्थांनी नियमांचे पालन करुन करोनाला गावात प्रवेशच करु दिला नाही. ग्रामस्थांनी करोनाचा शिरकाव होवू न देण्यासाठी घेतलेले निर्णय व नियमपालनामुळे हे शक्य झाले. करोनाचा शिरकाव रोखण्यासाठी गावाने केलेली एकजूट अन्य गावांसाठी आदर्श आहे.

गावात बाहेरुन येणार्‍या व्यक्तीला गावबंदी, विलगीकरण, सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी, गावातील भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांकडून गावातच विक्री, दुसर्‍या गावांतून येणार्‍या भाजीपाला व किराणामाल विक्रेत्यांना मनाई आदी उपाययोजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी एकजूटीतून करोनाचा गावात शिरकाव होऊ दिला नाही.

गावची लोकसंख्या 750 ते 800 असून गावात मुख्यत्वे शेतकरी, शेतमजूर, दलित व आदिवासी कुटुंबे आहेत. शेतकरी प्रामुख्याने ऊस, गहू, केळी इ. पिके घेतात. बारमाही बागायती शेती असल्याने गाव सधन आहे. बहुतांशी शेतकरी वर्ग स्वत:च्या शेतातच घरे बांधून राहत आहेत.

ग्रामस्थांनी वज्रमूठ करुन तालुक्याचे ठिकाणी जायचे नाही असा निर्धार केला आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत व अपरिहार्य कारणास्तव नेवासा येथे जाणे आवश्यक झाल्यास जाताना सक्तीने मास्क परिधान करण्यासह सोशल डिस्टंन्सींगचेही पालन केले जात आहे. आठवडे बाजार पूर्णत: बंद करण्यात आलेला आहे. शासनाच्या करोनाविरोधी अभियानांतर्गत गावात जनजागरण मोहिम सातत्याने राबविली जात आहे. ग्रामस्थांना करोनाची प्राथमिक लक्षणे, त्यावरील उपाययोजना व आजाराचे गांभिर्य याबाबत जागृती निर्माण करण्यात येत असून मोहिमेस चांगले यश आले आहे. ग्रामस्थांचा या मोहिमेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

गावात आरोग्य केंद्र नाही. लसीकरण कार्यक्रमांची मात्र आजपर्यंतही सुविधा उपलब्ध झालेली नाही. लसीचा तालुका आरोग्य केंद्रात तुटवडा असल्याने बहूसंख्य ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित आहेत.

गाव करोनामुक्त ठेवण्यासाठी गावातील युवा वर्ग पुढाकार घेत आहे. चिंचबन मित्रमंडळाचे सदस्य भाऊसाहेब शिंदे, सुनिल चव्हाण, अजित चव्हाण, राहुल डौले, अशोक थिटे, संजय जाधव, अरुण जाधव, संजय शिंदे, शंकर माळी यांसह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे प्रमुख दत्तात्रय मापारी, ग्रामपंचायत कर्मचारी व आशा आरोग्यसेविका यांचे याकामी सहकार्य मिळत असून गांव सतत करोनामुक्त ठेवण्याचा पक्का निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

गावनिहाय लसीकरण कार्यक्रम राबविणेबाबत आम्ही लवकरच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळे शेतमजूर व कष्टकरी जनतेस रोजगार बुडवून तालुक्याचे ठिकाणी लसीकरणांसाठी जावे लागणार नाही. ग्रामस्थांना गावांतच लसीकरण सुविधा उपलब्ध झाल्यास अधिक सुलभ होईल.

-विठ्ठलराव शिंदे सरपंच, चिंचबन

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com