
अहमदनगर (प्रतिनिधी)
श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम ब यांच्याविरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरी व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात छिंदम बंधूंचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केला आहे.
छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर ३० ते ४० जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरी व र अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. व याप्रकरणी दिल्लीगेट येथील टपरी चालक -. भागीरथ भानुदास बोडखे यांनी फिर्याद दाखल केली होती. छिंदम बंधूंसह त्यांच्या साथीदारांनी ९ जुलै रोजी दुपारी दिल्लीगेट येथे बोडखे यांना जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या ज्युस सेंटरमधील साहित्य फेकून दिले. यावेळी श्रीपाद छिंदम याने टपरीच्या गल्ल्यातील ३० हजार रूपये हिसकावून बोडखे व त्यांच्या मुलास शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून टाकली, अशी फिर्याद बोडखे यांनी दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर छिंदमसह चौघांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. येथे मात्र त्यांचे अर्ज नामंजूर झाले होते. त्यानंतर चौघांनी खंडपीठात धाव घेतली होती. येथे महेश सब्बन व राजेंद्र जमधाडे यांना अटकपूर्व जामीन मिळाला मात्र श्रीपाद व श्रीकांत छिंदम यांचा अर्ज नामंजूर केला आहे. फिर्यादीच्यावतीने खंडपीठात अॅड. विजय पी. लटंगे यांनी काम पाहिले.