अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
वाडिया पार्कात पार पडलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत कुस्तीप्रेमींचे लक्ष लागलेल्या अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने बाजी मारत 35 लाख रुपये किमतीच्या अर्धा किलो सोन्याची गदा पटकावली. लढतीत पुण्याच्या शिवराज राक्षे याला गंभीर दुखापत झाल्याने गायकवाड याला विजयी घोषित करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही गदा देऊन गायकवाडचा सन्मान करण्यात आला.
या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ऑलिंपिक कुस्तीमध्ये खाशाबा जाधव यांनी भारताला सुवर्णपदक पहिल्यांदा मिळवून दिले होते. त्यानंतर आजपर्यंत परत मिळालेले नाही. राज्यात आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर खेळाडूंच्या मानधनात भरघोस वाढ करत त्यांना प्रोत्साहन देत आहोत. मी मुख्यमंत्री असताना जे पैलवान महाराष्ट्र केसरी झाले त्यांना थेट पोलीस खात्यात नोकरी दिली. नगरमध्ये अंतराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाची मागणी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.
त्यासाठी त्वरित प्रस्ताव पाठवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी त्वरित मंजुरी देत निधीही देतो, असे आश्वासन राज्यच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राजकीय टोला मारताना ते म्हणाले, सध्या काही राजकारणीही सकाळी नशा करून कुस्ती करत आहेत. पण ते बाद होतील, जे असली मातीतील पैलवान आहेत तेच कुस्त्या जिंकतात. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही कुस्ती जिंकत आहोत. 2024 सालीही पुन्हा जिंकू, असा टोलाही फडणवीसांनी संजय राउत यांना नाव न घेता लावला.
नगर शहरात भाजप सेना युती व जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. स्पर्धेचा विजेता महेंद्र गायकवाड याला 35 लाख किमतीची सुवर्ण गदा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदान केली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा.डॉ.सुजय विखे, स्वागताध्यक्ष आ.राम शिंदे, आ.बबनराव पाचपुते, अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पवार, संजयकुमार सिंग, योगेश दोडके, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलीस अधिक्षक राकेश ओला, नरेंद्र फिरोदिया, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संयोजन समितीचे अभय आगरकर, वसंत लोढा, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, शहर प्रमुख दिलप सातपुते, संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, प्रा.भानुदास बेरड, बाबूशेट टायरवाले, सचिन पारखी, सुभाष लोंढे, प्रशांत मुथा, कुस्तीगीर परिषदेचे मेघराज खटके, गणेश दांगट व नवनाथ घुले आदींसह मोठ्या संख्येने युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, नगर मधील वाडियापार्क मैदानाला मोठे ऐतिहासिक महत्व आहे. अनेक राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय खेळाडू येथे घदलेअहेत. याठिकाणी एक भव्य अंतराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल उभे रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत कुस्ती संयोजकांचे कौतुक केले.
यावेळी स्वागताध्यक्ष आ.राम शिंदे यांनी मनोगतातून मान्यवरांचे शाब्दिक स्वागत करत शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात अभय आगरकर म्हणाले, नगरला कुस्तीची मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. भाजप सेना व तालीम संघ एकत्रित येत घेतलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून नवा पायंडा पडला आहे. त्यास सरकारने पाठबळ द्यावे अशी मागणी केली. वसंत लोढा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराकडे लक्ष देण्याची मागणी करत शहराची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी राज्य सरकारने एका हजार कोटी रुपयांचा निधी व चांगले प्रशासन द्यावे अशी मागणी केली. शिवसेनेचे सचिन जाधव यांनी स्वागत केले. आभार अनिल शिंदे यांनी मानले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे यांच्यात अंतिम कुस्तीची लढत लावण्यात आली. अत्यंत तुल्यबळ असलेले या दोन्ही मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांनी आखाड्या जवळच खुर्च्यांवर बसणे पसंत करत कुस्तीला दाद दिली. कुस्तीत दोन्ही मल्लांनी एकमेकांवर अनेक डाव टाकले. शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाड याच्यावर पकड घेतली. ती उलटवून लावताना महेंद्रने टाकलेल्या डावाने शिवराजचा पायाचा स्नायू दुखावल्याने तो जखमी झाला. त्याला स्ट्रेचर वरून आखाडा बाहेर उपचारासाठी नेण्यात आल्याने पंचांनी महेंद्र गायकवाडला विजयी घोषित केले. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोन्याची गदा प्रदान केली.
यावेळी शहर भाजपच्या वतीने देवेंद्र फडविसांना कमळ देवून, शिवसेनेच्या वतीने धनुष्यबाण देवून तर जिल्हा तालिम संघाने पहिलवानाचे शिल्प देवून सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी माजी खासादर स्व. दिलीप गांधी यांच्या परिवाराच्या वतीने श्रीमती सरोज गांधी, सुवेंद्र गांधी यांनी व माजी आमदार स्व.अनिल राठोड यांच्या परिवाराच्या वतीने विक्रम राठोड यांनी फडणवीस यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमास भाजपाचे सरचिटणीस विवेक नाईक, सेनेचे आनंदा शेळके, मदन आढाव, विशाल वालकर, उद्योजक अनिल जोशी, तालीम संघाचे अॅड.अभिषेक भगत, नाना डोंगरे, महेश नामदे, तुषार पोटे,प्रकाश लोळगे, शाम लोंढे, आशिष शिंदे, महेश लोंढे, धनंजय जाधव, बाबासाहेब वाकळे, प्रदीप परदेशी, बाळासाहेब भुजबळ, नितीन शेलार, आशिष अनेचा आदींसह भाजप सेना युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपविजेता मल्ल शिवराज राक्षेला 2 लाख व तृतीय विजेते ठरलेले सिकंदर शेख माती विभाग, माऊली कोकाटे गादी विभाग यांना प्रत्येकी 50 हजार देण्यात आले. तसेच सोन्याच्या गदेसह सुमारे 75 लाख रुपयांची रोख पारितोषिके यावेळी विविध वजन गटातील विजेत्यांना देण्यात आली.
माती विभाग अंतिम निकाल -
48 किलो वजनगट - प्रथम- अजय निंबाळकर (सोलापूर), द्वितीय- समीर खंडगीर (अहमदनगर), तृतीय- गहिनीनाथ शिर्के (बीड).
57 किलो वजनगट - प्रथम- सुरज अस्वले (कोल्हापूर), द्वितीय- अतुल चेचर (कोल्हापूर), तृतीय- संग्राम जगताप (पुणे).
61 किलो वजनगट - प्रथम- ज्योतीबा अटकळे (सोलापूर), द्वितीय- विजय पाटील (कोल्हापूर), तृतीय- विजय डोंगरे (सोलापूर).
65 किलो वजनगट - प्रथम- आबा अटकळे (सोलापूर), द्वितीय- पंकज पाटील (सांगली), तृतीय- सुरज कोकाटे (पुणे).
70 किलो वजनगट - प्रथम- सोनबा गोंगाणे (कोल्हापूर), द्वितीय- निखील कदम (पुणे), तृतीय- सद्दाम शेख (कोल्हापूर).
74 किलो वजनगट - प्रथम- अनिल कचरे (पुणे), द्वितीय- अक्षय चव्हाण (पुणे), तृतीय- जतीन आव्हाळे (धुळे).
79 किलो वजनगट - प्रथम- प्रकाश काळे (सोलापूर), द्वितीय- अविनाश शिंदे (बीड), तृतीय- महादेव कचरे (सोलापूर).
86 किलो वजनगट - प्रथम- कौतुक डाफळे (कोल्हापूर), द्वितीय- चंद्रशेखर गवळी (धुळे), तृतीय- राहुल काळे (सोलापूर).
गादी विभाग अंतिम निकाल -
48 किलो वजनगट - प्रथम- अभिजीत ठाणगे (अहमदनगर), द्वितीय- लक्ष्मण चव्हाण (हिंगोली), तृतीय- हर्षवर्धन जाधव (कोल्हापूर).
57 किलो वजनगट - प्रथम- अतीश तोडकर (बीड), द्वितीय- रमेश इंगवळे (कोल्हापूर), तृतीय- स्वप्निल शेलार (पुणे).
61 किलो वजनगट - प्रथम- योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड), द्वितीय- सौरभ इंगळे (सोलापूर), तृतीय- भरत पाटील (कोल्हापूर).
65 किलो वजनगट - प्रथम- सुमितकुमार भारस्कर (बीड), द्वितीय- विक्रम कुर्हाडे (कोल्हापूर), तृतीय- प्रदीप सुळ (सातारा).
70 किलो वजनगट - प्रथम- सौरभ पाटील (कोल्हापूर), द्वितीय- विनायक गुरव (कोल्हापूर), तृतीय- शुभम पाटील (कोल्हापूर).
74 किलो वजनगट - प्रथम- राकेश तांदुळकर (कोल्हापूर), द्वितीय- शुभम थोरात (पुणे), तृतीय- करण फुलमाळी (अहमदनगर).
79 किलो वजनगट - प्रथम- शुभम मगर (सोलापूर), द्वितीय- अक्षय घोडके (अहमदनगर), तृतीय- गौतम शिंदे (सोलापूर).
86 किलो वजनगट - प्रथम- कालीचरण सोलानकर (सोलापूर), द्वितीय- विजय सुसरे (नाशिक), तृतीय- पांडुरंग पारेकर (पुणे).