
अहमदनगर | प्रतिनिधी
नगरच्या वाडिया पार्क स्टेडियममध्ये येत्या २७, २८ व २९ मे रोजी छत्रपती शिवराय राज्यस्तरीय निमंत्रित कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ८०० हून अधिक मल्ल सहभागी होणार असून चांदीच्या गदेसह साडे सोळा लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे मल्लांना दिली जाणार आहेत. पुरुष मल्लांबरोबरच महिला मल्लांच्या देखील स्वतंत्र कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देत स्पर्धेची घोषणा स्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे व अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
अनेक वर्षांनंतर नगरच्या मैदानामध्ये कुस्त्यांचा भव्य आखाडा यानिमित्ताने रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, अहमदनगर जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने व सहकार्याने आणि किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ मे रोजी स्पर्धकांची नोंदणी तसेच अन्य तांत्रिक प्रक्रिया पार पडतील. २८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध यांच्यासह सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या तसेच वारकरी संप्रदायातील महानुभावांच्या व शहरासह जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचे उद्घाटन होईल. २९ मेला सायंकाळी ५.०० वाजता पार पडणाऱ्या अंतिम सामन्यांसाठी आणि बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडा, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. डॉ. सुधीर तांबे, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री बाळासाहेब थोरात, शरयु देशमुख, महानंदाचे चेअरमन रणजीत देशमुख, इंद्रजीत थोरात, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, अर्जुनवीर पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार, राज्य उपाध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, प्रशासकीय अधिकारी, मनपा पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, आजी-माजी सदस्य, आजी-माजी खासदार, माजी मंत्री, साखर कारखान्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, पंचायत समितीचे सभापती, पदाधिकारी, शहर व जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, पदाधिकारी, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आदींची उपस्थिती असणार आहे.
वैभव लांडगे म्हणाले की, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापुर, पुण्यापासून ते नागपूर पर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुरुष व महिला मल्ल या स्पर्धेसाठी येणार आहेत. या कुस्त्या मॅटवर होणार असून कुस्ती संघटनेचे ज्येष्ठ मल्ल हे पंच म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेचे फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी या स्पर्धांमधील नामवंत मल्ल यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर राज्यातील नावाजलेले कुस्तीपटू हा कुस्त्यांचा आखाडा रंगवणार आहेत. किरण काळे यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेत कुस्ती सारख्या आपल्या देशी खेळाला बळ दिले आहे. त्या माध्यमातून नगरला राज्यात एक मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम केले आहे. किरण काळे युथ फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा तालीम संघाची टीम स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेत आहे.
लांडगे पुढे म्हणाले की, पुरुष स्पर्धांच्या ओपन गटामध्ये ८४ ते १२० किलो पर्यंतचे मल्ल खेळू शकणार आहेत. या गटासाठी प्रथम पारितोषीक रु. ५ लाख व चांदीची गदा, द्वितीयसाठी रु.२ लाख व चषक तर तृतीयसाठी रू. ५० हजार दिले जाणार आहेत. ५७ किलो, ६५ किलो, ७४ किलो या तीन वजन गटासाठी प्रत्येकी प्रथम पारितोषिक रु. ७५ हजार, द्वितीय रू.५० हजार तर तृतीय रू. १० हजार आहे. ८४ किलो वजन गटासाठी प्रथम पारितोषिक रु. १ लाख, द्वितीय रु. ५० हजार तर तृतीय रू. ११ हजारचे आहे. महिला स्पर्धांमध्ये ५३ किलो वजन गटासाठी प्रथम पारितोषिक रु.३० हजारचे तर द्वितीय पारितोषिक रु. २५ हजारचे असणार आहे. ५७ किलो वजन गटासाठी प्रथम पारितोषिक रु.७५ हजारचे तर द्वितीय पारितोषिक रु.४० हजारचे असणार आहे. ६५ किलो वजन गटासाठी चांदीची गदा व रू. १ लाखाचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार असून द्वितीय पारितोषिक रु. ५० हजारचे असणार आहे.