लोहसरला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

राज्यात तिसर्‍या स्थानावर तर नाशिक विभागात प्रथम
लोहसरला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

करंजी (वार्ताहर)

महाराष्ट्र शासनाचा 2018-19 गाव व वन क्षेत्रातील वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनात भरीव कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरावर दिला जाणारा मानाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील लोहसर ग्रामपंचायतला जाहीर झाला आहे.

लोहसर ग्रामपंचायत या पुरस्कारात राज्यात तिसर्‍या स्थानावर असून नाशिक विभागामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळवण्यास यशस्वी ठरलो असल्याची प्रतिक्रिया गावच्या सरपंच हिराताई अनिल गीते यांनी दिली.

महाराष्ट्रामध्ये 29 हजार ग्रामपंचायती असून त्यात लोहसर ग्रामपंचायतला राज्यात तिसर्‍या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. यामुळे ग्रामपंचायतीला राज्य पातळीवरून 50 हजार रुपयांचे तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल विभागाच्यावतीने 50 हजार असे एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

लोहसर ग्रामपंचायत ही नगर जिल्ह्यातील प्रथम वनश्री ग्रामपंचायत म्हणून बहुमान मिळवणारी ग्रामपंचायत ठरली आहे. केलेली वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धनाचे हे फळ असून माजी सरपंच अनिल गीते पाटील यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी मोठे परिश्रम व कटू निर्णय घेतले होते. लोहसर ग्रामपंचायतने वन विभाग व लोकसहभागातून लोहसर गाव व शिवारातील रस्त्यांवर वृक्ष लागवड केली.

शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवडीमध्ये 80 हजार वृक्षांची लागवड केली. बिहार पॅटर्न योजनेतून लोहसरमध्ये चार रस्त्यांवर चार किलोमीटर परीसरात जवळपास चार हजार वृक्षांची लागवड केली. गावांतर्गत लोकसहभागातून स्मृती वृक्ष योजना राबवून 500 वृक्षांची लागवड केली. वृक्ष लागवड वृक्ष संवर्धनाबाबत लोहसर ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील सात ते आठ तालुक्यांमध्ये प्रबोधन रथाच्या माध्यमातून जनजागृती केली. लोहसर वन परिसरामध्ये वृक्षतोडीस बंदी केली. तसेच ग्रामपंचायत अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती ही जिल्ह्यातील एक सक्षम वन व्यवस्थापन समिती म्हणून परिचित आहे.

गावाच्या परिसारातील जंगलात वन व्यवस्थापन समितीने पाणवठे तयार केलेले आहेत. त्याचबरोबर वृक्षतोड होऊ नये म्हणून लोसर गावांमध्ये वन विभागामार्फत 400 घरगुती गॅसचे वाटप केलेले आहेत. लोहसर ग्रामपंचायतला 2018 चा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा वनग्राम पुरस्कार मिळालेला आहे. लोसर ग्रामपंचायतला 2017-18 चा तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला असल्याचे सरपंच हिराताई गीते यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com