अहमदनगर (प्रतिनिधी) -

नगर शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या अशी मागणी

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाने केली आहे. पूल उभारणीच्या काम आताशी कुठे सुरू झाले असून अनेकांनी अनेक नावांची मागणी प्रशासनाकडे केली आहे. राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा अंजली आव्हाड, ताज खान, शहानवाझ शेख, सुफीयान शेख, सुजात दिवटे, नयना शेलार, सरफराज कुरेशी, शाहरुख शेख, वसीम शेख, सोहेल सय्यद यांनी या नव्या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना दिले.

पुणे, नाशिक, औरंगाबाद शहराच्या धर्तीवर वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक सुरळीत असावी, या हेतूने शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. अहमदनगर शहराला दिडशे वर्षांपुर्वीचा ऐतिहासिक वारसा लाभला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास अहमदनगरशी जोडला गेलेला आहे. शिवाजी महाराज हे सर्व समाजाची अस्मिता व भूषण आहे.

शहरातील उड्डाणपूलास छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे प्रशासकीय स्तरावर नामकरण व्हावे ही प्रत्येक नगरकरांची इच्छा आहे. या उड्डाणपूलास कोणत्याही राजकीय पुढार्याचे नाव देण्यात येऊ नये. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने स्थानिक शहरवासियांच्या मागणीचा विचार करून शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.

उभारणीपूर्वीच वाढला गुंता

गत आठवड्यात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नगरला आले होते. त्यावेळी पुलास स्व. अनिल राठोड यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली. त्यासंदर्भात मंत्री शिंदे यांनी तसा ठराव करून शासनाला पाठवा असे सांगितले. आता राष्ट्रवादीने नवीनच मागणी केल्याने पुलाच्या नामकरणाचा गुंता उभारणीपूर्वीच वाढला आहे.