मनाई असतानाही निघाली मिरवणूक

चौकाचौकात भगवे झेंडे अन् पताका
मनाई असतानाही निघाली मिरवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या पाचशे लोकांच्या मर्यादा नियमाला हरताळ फासत नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली.

शनिवारी सायंकाळी डीजेच्या आवाजात जल्लोष करत मिरवणूकही काढण्यात आली. चौकाचौकात भगवे झेंडे, पतकांचे तोरण बांधत छत्रपतींच्या शौर्याची महती सांगणारे पोवाडे लावल्याने अवघे वातावरण शिवमय झाले. हिंदवी स्वराज्य संस्थापक, आदर्श जाणता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त नगर शहरासह उपनगरात विविध कार्यक्रम पार पडले. माळीवाडा बसस्थानकाशेजारील छत्रपती महाराजांच्या आश्वरूढ पुतळयास महापूजा, आरती व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने अवघे नगर दणाणून गेले. जिल्हा प्रशासनाने छत्रपतींच्या जयंतीनिमित्त निघणार्‍या मिरवणुकांना मनाई केली होती. तशा नोटीसाही पोलिसांनी बजावल्या. मात्र पोलिसांच्या नोटीसा व मर्यादा नियमाकडे दुर्लक्ष करत नगरकरांनी डीजेच्या आवाज जल्लोषात मिरवणूक काढली. पाच मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. दरम्यान मिरवणूक निघाल्याचे समजताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त मिरवणूक मार्गावर तैनात केला. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. कोविड काळात मागील दोन वर्षापासून शिवजयंतीच्या उत्साहाला नगरकरांनी मुरड घातली होती. यंदा मात्र दणक्यात मिरवणूक काढत शिवजयंती साजरी करण्यात आली.

असा होता पोलीस बंदोबस्त

पोलीस उपअधीक्षक 1, पोलीस निरीक्षक 2, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक 7, पोलीस कर्मचारी 125, होमगार्ड 50 आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी यांचा समावेश होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com