दुर्लक्षित गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करणे शिवभक्तांची जबाबदारी - छत्रपती संभाजीराजे

दुर्लक्षित गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करणे शिवभक्तांची जबाबदारी - छत्रपती संभाजीराजे

अकोले |प्रतिनिधी| Akole

छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्य निर्माण केले. छत्रपतींचे आदर्श विचार आजही प्रेरणा देणारे आहेत. स्वराज्याच्या रक्षणासाठी गड किल्ल्यांची निर्मिती म्हणजे अभूतपूर्ण गोष्ट आहे.दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे संवर्धन व जतन करणे शिवभक्तांची जबाबदारी आहे, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.

विश्रामगड (ता.अकोले) येथे आयोजित 342 व्या शिवपदस्पर्श दिन कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार राजाभाऊ वाजे, यशवंत आभाळे, उदय सांगळे, राजेंद्र डावरे, कैलास जाधव, नामदेव शिंदे, रामदास भोर, लकीभाऊ जाधव, दत्ता जाधव, काळू भांगरे, शेखर वालझाडे, भरत मेंगळ, सुभाष तळपाडे, गणपत गोडे, सचिन गोडे, नवशीराम गोडे, बाळू साबळे, भगवान शिंदे, विठ्ठल पेढेकर, बाळू पेढेकर, बबन जाधव आदींसह सिन्नर -अकोले तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणगाव याठिकाणी छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे जल्लोषात स्वागत करत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले की, जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य माहीत आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले ही इतिहासाची साक्ष आहे. या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता फोर्ट सेव च्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करू.शासन गडकिल्ल्यांच्या बाबतीत उदासीन आहे.त्यांच्यावर अवलंबून राहून चालणार नाही. सर्व शिवप्रेमी व शिवभक्तांनी आपल्या गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बनविलेले गडकिल्ले म्हणजे दैवाचा आविष्कार आहे.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नामुळे विश्रामगडवर शिवसृष्टी साकारली आहे तसेच विश्रामगडाच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न झालेले आहेत त्यामुळे शिवप्रेमी व पर्यटकांची याठिकाणी दिसून येते. गडकिल्ले चढणे उतरणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. आमदार आणि खासदारांनी फक्त एकदा रायगड चढावा विना रोप वे मग काय आहे गड किल्ले तेव्हा कळेल. मी आदल्या दिवशी अंदमान निकोबार येथे असताना या कार्यक्रमाला निघायचं होतं पण पावसाचे वातावरण निर्माण झाले होते विमानाने यायचे होते, शिवाजी महाराजांचीच इच्छा होती मी याठिकाणी पोहचावे रात्रभर प्रवास करत आलो. मी या पूर्वीच या गडावर येणे गरजेचे होते. माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. भर पावसात विश्रामगड सर केला.वरूणराजाने पावसाच्या रूपाने अभिषेकच केला आहे. भरपावसात आपण सर्वजण मोठ्यासंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक कौतुक करतो, असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी विश्रामगड चढून जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विधिवत पूजा केली. पावसाचे जोरदार आगमन झाले तरी भरपावसात त्यांनी विश्रामगड सर करत उतरुनही आले. विशेष बाब म्हणजे एकही ठिकाणी विसावा न घेता अखंडपणे चालतच राहिले. ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालयातील विद्यार्थिनींच्या झांज पथकाने उपस्थितांची मने जिंकली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले विश्रामगडवर आल्याने आढळा परिसरातील नागरिकांना मनस्वी आनंद झाला आहे. महाराजांच्या दर्शनाने शिवप्रेमी धन्य पावले. माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रयत्नाने विश्राम गडाचा कायापालट झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असून या भागातील युवकांना रोजगाराची व व्यवसायाची मोठी संधी मिळाली आहे. या भागातील पर्यटन विकासासाठी अजून या विश्रामगडाकडे शासनाने लक्ष द्यावे यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती छत्रपती संभाजी राजे यांना करण्यात आली.

- कैलासराव जाधव सदस्य, गडवाट प्रवास सह्याद्रीचा

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले विश्रामगडवर येणार होते हे माहीत असताना देखील अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले नाही या गोष्टीचा आढळा परिसराच्या वतीने मी निषेध करतो.

-काळू भांगरे, अध्यक्ष- आदिवासी विकास परिषद अहमदनगर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com