युजीसीच्या सचिवांना पाठविले ‘शंखपुष्पी’
सार्वमत

युजीसीच्या सचिवांना पाठविले ‘शंखपुष्पी’

Nilesh Jadhav

संगमनेर | प्रतिनिधी | Sangmner

विश्वविद्यालय अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाचा छात्रभारती संघटनेने निषेध नोंदविला आहे. तर विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या सचिवांची स्मरणशक्ती कमी झाल्याचे वाटते, असे म्हणत त्यांना स्मरण शक्ती वाढण्यासाठी शंखपुष्पी हे औषध व निषेधाची काळी गुलाबाची फुले पोस्टामार्फत पाठविली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी देखील संघटनेने केली आहे.

देशात करोनाने थैमान घातले आहे, असे असतांना युजीसी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे युजीसीच्या सचिवांची स्मरणशक्ती कमी झाल्याचे वाटते आहे. वारंवार बदलती भुमिका विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकत आहे. त्यामुळे सचिवांची स्मरण शक्ती वाढण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी छात्रभारती संगमनेरच्या वतीने ‘शंखपुष्पी’ हे औषध पाठविले आहे. या औषधाने सचिवांची स्मरणशक्ती वाढेल. हे औषध लहान मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी दिले जाते, औषध घेतल्यावर तुमची ही स्मरणशक्ती वाढेल व शुद्ध बुद्धीने विचार करुन सद्य परिस्थितीची अनुभूती येईल व आपण अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करुन विद्यार्थी हिताचा योग्य निर्णय घ्याल, असे छात्रभारती संघटनेने म्हटले आहे. परीक्षा रद्द करुन विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा, असेही संघटनेने म्हटले आहे.

सचिवांना स्मरणशक्ती वाढण्यासाठी शंखपुष्पी औषध व काळी गुलाबाची फुले निषेधार्थ पोस्टामार्फत पाठविली आहे. यावेळी छात्रभारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हाध्यक्ष प्रशांत काकड, कार्याध्यक्ष तुषार पानसरे, तालुकाध्यक्ष गणेश जोंधळे, उपाध्यक्ष राधेश्याम थिटमे, ऋषिकेश वाकचौरे आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com