रासायनिक खतांसह पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करावी

शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन
रासायनिक खतांसह पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करावी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांच्या किंमतीत आणि पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केली असून शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करत सदरची दरवाढ रद्द करावी या मागणीचे निवेदनपत्र प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, यंदाचा खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. त्यासाठी पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे.परंतु गेल्या एक वर्षापासून असलेली करोनाची टाळेबंदी, आणि अवकाळी पर्जन्य, वादळ यामुळे शेतकर्‍यांच्या शेती मालाला मोठा फटका बसला असल्या कारणाने झालेले उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. यंदाचा खरीप हंगाम जवळ आला असून त्यासाठी लागणारे खते, बियाणे यासाठी शेतकरी आर्थिक गणित जुळविण्याच्या तयारीत लागले आहे. असे असताना भाजपा शासित केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ दरवाढ केल्यामुळे आधीच आर्थिक गर्तेत अडकलेला शेतकरी अजून संकटात सापडला आहे.

पूर्वी 1185 रुपयांना मिळणारी डि ए पी ची गोणी आता 1900 रुपयाला झाली असून त्याचप्रमाणे 10 : 26:26 च्या 50 किलो गोणीची किंमत 1175 होती ती आता 1775 झाली आहे. अशाप्रकारे सर्वच मिश्रखतांच्या किंमतीत भाजपाशासित केंद्र सरकारने 15 ते 17 टक्के दरवाढ केली आहे. ही दरवाढ शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडणारी आहे. त्याबरोबरच आता पेरणीपुर्व मशागती सुरू असुन यासाठी ट्रॅक्टरला डिझेलची आवश्यकता असते, केंद्र शासनाने डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली असल्याने शेती मशागतीचे ट्रॅक्टरचे दर सुद्धा वाढले आहे.

पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या खतांच्या , आणि इंधन दरवाढीचा जाहीर निषेध करतो व शासनाचा प्रतिनिधी या नात्याने आपणास विनंती करतो आपण आमची मागणी केंद्र शासनाकडे पोहचवून ही दरवाढ रद्द करण्यात यावी.

राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, संदीप सोनवणे, महिंद्र शेळके, निलेश कोते, दीपक गोंदकर, राकेश कोते, अमित शेळके, विशाल भडांगे, प्रकाश गोंदकर, राहुल कुलकर्णी, साई कोतकर, अजित जगताप, राहुल फुंदे, सचिन गव्हाणे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com