रासायनिक कंपन्या व कृषी दुकानदारांकडून शेतकर्‍यांची लूट

रासायनिक खत खरेदी मागे वस्तू घेणे बंधनकारक, शेतकर्‍यांना मोठा मनस्ताप
रासायनिक खतांमागे अशा प्रकारची बाटली घेणे शेतकर्‍यांना बंधनकारक केले आहे.
रासायनिक खतांमागे अशा प्रकारची बाटली घेणे शेतकर्‍यांना बंधनकारक केले आहे.

राहाता | Rahata

रासायनिक कंपन्यांनी कृषी उद्योग व्यावसायिकांना विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या खरेदीवर 1 किलोचा पावडरचा पुडा व 1 लिटर लिक्विडची बाटली व 10 किलोची बादली घेण्यास बंधनकारक केल्यामुळे परिणामी शेतकर्‍यांना कृषी उद्योग दुकानदारांकडून रासायनिक खतांच्या खरेदी मागे सदर वस्तू खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्यामुळे शेतकर्‍यांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. कृषी विभागाने तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांची होणारे आर्थिक नुकसान थांबवावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

राहाता शहर व परिसरातील कृषी उद्योग व्यावसायिकांना रासायनिक कंपन्यांनी इफको, डीएपी, उज्वला युरिया,12ः32ः16 अशा विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या प्रत्येक गोणी खरेदीवर मायक्रो न्यूट्रियन, झीप सोईल कंडीशन, विद्राव्य खत, लिक्विड नॅनो युरिया अशा विविध प्रकारच्या 1 लिटर बाटली, पुडा व 10 किलोची बादली घेणे बंधनकारक केल्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची चर्चा शेतकरी बांधवांमधून होत आहे.

सध्या सर्वत्र पाऊस समाधानकारक होत असल्यामुळे राहाता तालुक्यात सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी असे विविध प्रकारची खरिपाची पेरणी करण्यात शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरू, चिकू, डाळिंब, आंबा या फळबागा असल्यामुळे पिके व फळबागेपासून दर्जेदार उत्पन्न मिळावे याकरिता शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. त्यामुळे तालुक्यातील सर्व रासायनिक खतांच्या दुकानात शेतकर्‍यांची खते खरेदी करण्याकरिता झुंबड उडाली आहे.

असे असताना इफको 10ः26ः26 प्रत्येकी एक किंवा दोन गोण्या खरेदीवर 1 लिटर नॅनो युरियाची 240 रुपयाची बाटली, डीएपी 18ः46ः0 गोणी खरेदीवर झीप माईट सॉईल कंडिशन बाटली, 12ः32ः16 गोणी खरेदीवर 650 रुपयांची 10 किलो मायक्रो न्यूट्रीयन बादली तसेच उज्वला युरिया 19ः19ः19 गोणी खरेदीवर 140 रुपयांचा विद्राव्य खताचा पुडा अशा विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या गोण्यावर या वस्तू घेण्यास शेतकर्‍यांना बंधनकारक केले जात असल्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.

गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने करोना महामारीमुळे शेतकर्‍यांच्या शेती मालाला चांगला दर न मिळाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक घडी मोठ्या प्रमाणात विस्कटली आहे. करोनामुळे शेतकर्‍यांना शेतीमालाची कवडीमोल भावात विक्री करावी लागली. पेरू, आंबा, चिकू, डाळिंब, द्राक्ष व भुसार मालाला विक्रीसाठी बाजारपेठ वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे शेतकरी बांधवांना सातत्याने दोन वर्षांपासून आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

यावर्षी पाऊस समाधानकारक होईल या अपेक्षेने शेतकर्‍यांनी पैशाची जुळवाजवी करत शेती मशागत करून खरीप पेरणी करण्यासाठी तयारी केली. परंतु रासायनिक खते घेण्याकरिता खतांच्या गोणी मागे या वस्तू घेणे दुकानदारांकडून बंधनकारक केले जात असल्यामुळे शेतकर्‍यांना रासायनिक खते घेणे मुश्किल झाले आहे. आम्हाला रासायनिक खतांच्या कंपन्यांकडून या वस्तू घेणे बंधनकारक केले आहे वस्तू घेतल्या नाही तर रासायनिक कंपन्या आम्हाला खते देत नाहीत. रासायनिक कंपन्यांकडून कृषी उद्योग दुकानदारांना विनाकारण वेठीस धरतात. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकर्‍यांना आम्हाला गोण्यांच्या खरेदी मागे या वस्तू द्यावा लागतात, असे कृषी उद्योग दुकानदारांनी बोलून दाखवले.

विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या गोण्यावर शेतकर्‍यांना या वस्तू घेणे बंधनकारक नाही. तसेच जो कोणी दुकानदार जादा दराने खतांची विक्री व खतांच्या गोण्यामागे या वस्तू घेण्यास बंधनकारक करत असेल अशा ग्राहकांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा.

- बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी राहाता

शेतकर्‍यांना रासायनिक खताच्या गोणी खरेदीवर बळजबरीने या वस्तू घेण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांचा दुकानदारांवर वचक राहिला नसल्यामुळे या गोष्टी घडतात. याला कृषी विभाग जबाबदार आहे. रासायनिक कंपन्यांकडून व दुकानदारांकडून होणारी शेतकर्‍यांची लूट थांबवण्याकरिता आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालावे, अशी सर्व शेतकरी बांधवांच्यावतीने आम्ही त्यांना विनंती करणार आहोत.

- राहुल सदाफळ, 15 चारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com