पैसे दामदुप्पट करुन देतो असे म्हणून फसवणूक करणारे दोघे गजाआड

पैसे दामदुप्पट करुन देतो असे म्हणून फसवणूक करणारे दोघे गजाआड

संगमनेर (प्रतिनिधी) - पैसै दामदुप्पट करुन देतो म्हणून एका सेवानिवृत्त जवानाला फसविल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणार्‍या दोघा जणांना गजाआड केले आहे.

याबाबत माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथील मच्छिंद्र मारुती पानसरे (वय 44) हे 1 मे 2015 रोजी भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे मामा मारुती रखमाजी उंबरकर (रा. उंबरीबाळापूर) व त्यांचे मित्र अर्जुन गणपत आंधळे (रा. प्रतापपुर, ता. संगमनेर) या दोघांनी मच्छिंद्र पानसरे यांच्या घरी येवून सांगितले की, आमची मुंबई येथे अथर्व 4 यु इन्फ्रा अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो लि. नावाची कंपनी आहे.

या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवा, चार वर्षात तुम्हाला त्याचा परतावा दामदुपट्टीने मिळेल. पैसे दुप्पट न झाल्यास आम्ही आमची जमिन विकुण पैसे देवू असा विश्‍वास दिला. सख्या मामाने खात्री दिल्याने मच्छिंद्र पानसरे यांनी 31 डिसेंबर 2014 रोजी 50 हजार रुपये गुंतवले त्याची रितसर दोन दिवसांनी अथर्व 4 यु इन्फ्रा अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो लि. या नावाने पावती दिली. त्यानंतर 18 ऑगस्ट 2015 रोजी फिर्यादीने त्यांच्या पत्नीच्या नावावर 2 लाख रुपये व स्वतःच्या नावावर 2 लाख रुपये असे 4 लाख रुपये जमा केले. त्यानंतर दामदुप्पट परतावा मिळेल म्हणून परत फिर्यादीचे पत्नीचे नावे दि. 27 फेब्रुवारी 2015 रोजी 50 हजार रुपयांची पावती केली. त्यानंतर पुन्हा 2 हजार रुपये महिना प्रमाणे फिर्यादीचे पत्नीचे नावावर 18 हप्ते एकूण 36 हजार रुपये भरले.

फिर्यादी यांनी अथर्व 4 यु इन्फ्रा अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो लि. कंपनीत दि. 31 डिसेंबर 2014 पासून आत्तापर्यंत 5 लाख 36 हजार रुपये गुंतवले आहे. वरील ठेव पावत्यांची मुदत संपल्यानंतर फिर्यादी मच्छिंद्र पानसरे यांनी त्यांचे मामा मारुती रखमाजी उंबरकर व त्यांची पत्नी चंद्रकला मारुती उंबरकर व त्यांचा मित्र अर्जुन आंधळे यांना मुदत ठेव पावत्यांची मुदत संपल्यानंतर वारंवार पैशांची मागणी केली. मात्र उंबरकर व आंधळे यांनी सांगितले की सहा महिन्यानंतर सर्व पैसे मिळतील. त्यानंतर सहा महिने संपले पुन्हा पैशांची मागणी केली असता पैसे मिळाले नाही.

तेव्हा मारुती रखमाजी उंबरकर व अर्जुन आंधळे यांनी आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत मच्छिंद्र पानसरे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 202/2021 भारतीय दंड संहिता कलम 420, 406, 34 तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम 1999 चे कलम 3 प्रमाणे दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी मारुती रखमाजी उंबरकर व अर्जुन गणपत आंधळे या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे करत आहे.

सदर कंपनी अथर्व 4 यु इन्फ्रा अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो लि. व वरील आरोपी यांनी अजून नागरीकांची फसवणूक केली असल्याची दाट शक्यता आहे. तरी या कंपनीकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी फिर्याद देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com