स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी सोडवू

ना. विखे पा. यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी सोडवू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अधिवेशन संपल्यावर लवकरच जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या व रेशन कार्डधारकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन दुकानदारांच्या समस्या मांडत निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.

दुकानदारांच्या विविध अडचणी मांडताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई म्हणाले, जिल्ह्यात वेळेवर धान्य वाहतूक न झाल्याने अनेक दुकानदारांना महिना संपल्यावर धान्य उपलब्ध होते. महिना बदलल्यामुळे ते धान्य मशिनवर दिसू शकत नाही. त्यामुळे धान्य असूनही कार्डधारकांना त्याचे वाटप करता येत नाही. पर्यायाने कार्डधारकांचे धान्य बुडते. त्यामुळे धान्य वाहतूक सुरळीत करावी. गेल्या काही महिन्यांपासून धान्य वाटप करण्याच्या ई-पॉज मशिनला अनेक अडथळे येत असल्याने दुकानदारांना धान्य वाटप करणे मुश्कील झाले आहे.

धान्य असूनही वाटप करता न आल्याने दुकानदारांना कार्डधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. धान्य आल्यानंतर ते वेळेवर मशिनवर टाकले जात नाही, दुकानदारांनी मोफत धान्य वाटप केले परंतु त्याचे मार्जिन अद्यापी दुकानदारांना मिळाले नाही. राज्य शासनाने मे 2021 मध्ये मोफत धान्य देण्याचे जाहीर केले, त्याचे पैसे दुकानदारांनी भरले होते, ते कमिशनसह परत मिळावे, दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, अशा मागण्या दुकानदारांच्या शिष्टमंडळाने केल्या.

शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाक पठाण, चंद्रकांत झुरंगे, संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वहाडणे, गणेश येलम, श्रीकांत म्हस्के, कृष्णा गागरे, बाळासाहेब धनवटे, अजीज शेख, किशोर चेचरे आदींचा समावेश होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com