स्वस्त धान्य दुकानदारावर परवाना रद्दची कारवाई करा

प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत बेलपिंपळगाव ग्रामसभेत ठराव मंजूर
स्वस्त धान्य दुकानदारावर परवाना रद्दची कारवाई करा

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेमध्ये धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करून कारवाई करण्यात यावी या मागणीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

विशेष ग्रामसभेमध्ये प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी धान्य दुकानदाराचा परवाना तसेच रेशनकार्डावरील नाव कमी करणे, नवीन नाव घालणे, आधार दुरुस्ती, आदिवासींच्या आधारकार्ड, जातीचे दाखले व नवीन रेशनकार्ड, तसेच बेलपिंपळगाव येथील गावतळे आरक्षित करून बारमाही करण्यासह विविध प्रश्नांवर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत आश्वासन दिले.

12 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतसमोर सरपंच कृष्णा शिंदे यांच्यासह उपसरपंच गणेश कोकणे, ग्रामपंचायत सदस्य किशोर गारुळे, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कांगुणे, पोपटराव सरोदे यांनी रेशन धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा, आदिवासी समाजाच्या व्यक्तींच्या रेशनकार्ड, जातीचे दाखले, आधारकार्ड, इतर समाजाच्या रेशनचे धान्य मिळावे या मागणीसाठी उपोषण करून रास्ता रोको आंदोलन केले होेते. त्यावेळी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी आंदोलकांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधत सर्व मागण्या सोडविण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते.

शिवसेनेचे अशोकराव गायकवाड, तहसीलदार संजय बिरादार, सर्कल व तलाठी रायपल्ली, पोलीस पाटील संजय साठे, तंटामुक्ती अध्यक्ष भीमराज साठे, उपसरपंच गणेश कोकणे, माजी सरपंच राजेंद्र साठे, माजी सरपंच बाळासाहेब तर्‍हाळ, चंद्रशेखर गटकळ, बाळासाहेब शिंदे, रवी शेरकर, संचालक अमोल कोकणे, वसंत रोटे, गणेश शिंदे, चेअरमन सुनील शेरकर, बाबासाहेब रोटे आदी उपस्थित होते. गावातील कार्यकर्ते व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आम्हाला उपोषणात मोठा पाठिंबा दिल्यामुळे या गोरगरिबांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असल्याचे सरपंच कृष्णा शिंदे म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com