अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नियमाप्रमाणे मोहोज खुर्द (ता. पाथर्डी) येथे चारा छावणी चालवून देखील त्याचे बील अद्याप मिळाले नसल्याने, सदरील बील त्वरीत मिळण्याच्या मागणीसाठी

सिध्दार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले.

उपोषणात संस्थेचे चेअरमन जे.बी. वांढेकर, संचालिका लताबाई वांढेकर, रामनाथ म्हस्के, मंदाबाई वांढेकर, मंगल सोनवणे सहभागी झाले होते. मोहोज खुर्द (ता. पाथर्डी) येथील सिद्धार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2019 दरम्यान पाथर्डी उपविभागीय अधिकारी यांनी छावणीला परवानगी दिली होती.

महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयाच्या आदेशाला अधीन राहून 150 जनावरांची अट शिथील करून संस्थेला छावणीची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे छावणी सुरू होती. आदेश यापुढे कायम केला होता. तर त्यानंतर पाऊस पुरेसा झाला नसल्याने शासनाने पुन्हा शासन निर्णयाप्रमाणे छावण्यांना मुदतवाढ दिली. त्याप्रमाणे तहसीलदार यांनी दैनंदिन अहवाल स्वीकारलेला आहे.

या छावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी 150 जनावरांची अट शिथिल केल्यामुळे छावणी 10 सप्टेंबर 2019 पर्यंत सुरू होती. पाऊस समाधानकारक झाल्यामुळे छावणी बंद करण्यात आली. संस्थेला 31 जुलै 2019 पर्यंत छावणीचे बील मिळालेले आहे. परंतु तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांचे पत्राचे कारण सांगून 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2019 चे बील नाकारलेले आहेत.

मांडवे, दगडवाडी व घाटशिरस येथील छावण्यांना बील अदा करण्यात आलेले आहे. आमच्या संस्थेची 75 टक्के बील रक्कम 3 लाख 92 हजार 268 रुपये तहसीलदार पाथर्डी यांच्याकडे जमा आहे. तरी देखील तहसीलदार यांनी पेमेंट देता येत नाही असे पत्रानुसार बील नाकारले असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.